तुर्भे विभागात पोलिसांचे काेंबींग ऑपरेशन  

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत तुर्भे विभागातील तुर्भे, सीबीडी, एनआरआय, नेरुळ आणि सानपाडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ एप्रिल रोजी रात्री कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या ३९० कारवाया करुन अंमली पदार्थ आणि दारुचे सेवन करणारे, हत्यार बाळगणारे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे तसेच अंमली पदार्थ, मद्याचे सेवन आणि विक्री करणारांचे धाबे दणाणले आहेत.  

लोकसभा निवडणुकीदरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड वरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची झाडाझडती  सुरु केली आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागामध्ये कोंबींग ऑपरेशन राबवून गुन्हेगार आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. त्यानुसार २६ एप्रिल रोजी रात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत तुर्भे विभागातील तुर्भे, सीबीडी, एनआरआय, नेरुळ आणि सानपाडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबींग ऑपरेशन राबवण्यात आले होते.

  यासाठी ३० पोलीस अधिकारी आणि १३९ पोलीस अंमलदारांच्या माध्यमातून तुर्भे विभागातील ५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाणे अंतर्गत विविध पथके तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत पोलिसांच्या पथकांनी दारुबंदीच्या कलम ६५ आणि कलम ८५(१) नुसार एकूण ४९ कारवाया तसेच अंमली पदार्थाचे सेवन करणारे १३, बेकायदेशीर हत्यार बाळगणारे २ त्याचप्रमाणे कोपटा अंतर्गत ३७ तसेच ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह'च्या २ कारवाई करण्यात आल्या. त्याचप्रमाणे कलम २८५ नुसार २१, कलम २८३ नुसार ११ तसेच मोटर व्हेईकल ॲक्ट नुसार २५५ अशा एकूण ३९० कारवाया कारण्यात आल्या.  
सदर नाकाबंदी आणि कोंबींग ऑपरेशन मध्ये तुर्भे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड यांनी स्वतः सहभागी होऊन पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले. सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशावर किरकोळ कारणावरुन चौघा मारेक-यांचा जिवघेणा हल्ला