कार मधील लॅपटॉप चोरणारे आंतरराज्य टोळीतील त्रिकुट जेरबंद

नवी मुंबई : रस्त्यालगत पार्क असलेल्या कारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप चोरणाऱ्या त्रिकुटाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. सेनिथील दुरायरजन कुमार आर. डी. (४८), मुर्ती रामासामी चिन्नापपन (३०) आणि शिवा विश्वनाथन (४७) अशी या त्रिकुटांची नावे असून सदर चोरटे खास लॅपटॉप चोरण्यासाठी तामिळनाडू राज्यातील तिर्ची येथून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या चोरट्यांनी नवी मुंबईसह इतर भागात केलेले ७ गुन्हे उघडकीस आले असून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरलेले १० लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहेत.  

या चोरट्यांनी १० जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास वाशी, सेक्टर-१७ मधील विज्ञान सोसायटी समोरील रोडवर पार्क केलेल्या दोन कारच्या काचा फोडून दोन्ही कारमधील दोन ॲपल कंपनीचे लॅपटॉप चोरुन पलायन केले होते. त्यानंतर वाशी पोलिसांनी अमेय विचारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता. त्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपींची ओळख पटवण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यातील अभिलेख तपासण्यास सुरुवात केली होती.  

दरम्यान, सदर चोरट्यांनी जे लॅपटॉप चोरले होते, त्यातील अमये विचारे यांचा लॅपटॉप त्यांच्या आयफोनशी कनेक्ट असल्याने विचारे यांना त्यांच्या आयफोनवर वारंवार सदर लॅपटॉपचे लोकेशन मिळत होते. यावरुन सदर आरोपींचे लोकेशन सीएसएमटी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर आणि पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, पवन नांद्रे, पोलीस उपनिरीक्षक निलेश बारसे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ रेल्वेने सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठले. यावेळी सदर चोरटे आपल्या मुळ गावी ट्रेनने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, वाशी पोलिसांनी स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने लॅपटॉपच्या लोकेशनच्या आधारे तीन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले.  

 यावेळी चोरट्यांकडे असलेल्या बॅगांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरलेले १० लॅपटॉप सापडले. त्यानंतर पोलिसांनी सदरचे लॅपटॉप जप्त करुन चोरट्यांना अटक केली. सदर चोरट्यांकडे केलेल्या तपासादरम्यान ते तमिळनाडू राज्यातील तिर्ची येथून लॅपटॉप चोरण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी मागील २० दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर फिरुन वाशी, नवघर, मुलुंड, सीबीडी, नाशिक, पुणे, पंढरपूर या भागातून कारच्या काचा फोडून त्यातील १० लॅपटॉप चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांनी विविध भागात केलेले ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.  

कारवाईत पकडण्यात आलेली टोळी सराईत असून त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात केलेले ७ गुन्हे उघडकीस आले असले तरी या टोळीने संपूर्ण भारतभरात अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यानुसार या टोळीची अधिक चौकशी करण्यात येत आहे. सदर चोरटे चोरलेल्या या लॅपटॉपची तामिळनाडू राज्यात विल्हेवाट लावत असल्याचे देखील तपासात आढळून आले आहे.   - शशिकांत चांदेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-वाशी पोलीस ठाणे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कळंबोलीतील बेपत्ता तरुणीची प्रियकराकडून हत्या