थर्टीफस्टच्या पार्टीसाठी अंमली पदार्थाची विक्री करणा-यासह दोघे अटकेत    

5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे मेफेड्रोन जप्त  

नवी मुंबई : थर्टीफस्टच्या पुर्वसंध्येला कळंबोली भागात एमडी (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या व त्याला अंमली पदार्थांचा पुरवठा करणा-या व्यक्तीला अशा दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून अटक केली आहे. या कारवाईत   अंमली पदार्थ विरोधी पथकाने 56 ग्रॅम वजनाचे 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे.

र्थर्टीफस्ट निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यामध्ये अंमली पदार्थाचा वापर होण्याची शक्यता असल्याने अशा पार्ट्यावर तसेच अंमली पदार्थाच्या खरेदी विक्री करणाऱयांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अंमली पदार्थाची विक्री व सेवन करणा-या व्यक्तींवर विशेष पथकाद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते. यादरम्यान एक व्यक्ती कळंबोली सेक्टर-11 मधील गुरुद्वारा समोर अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.  

सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मोरे व त्यांच्या पथकाने रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास कळंबोलीतील गुरुद्वारा जवळ सापळा लावला होता. याठिकाणी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मोहसिन फारुख झरीवाला (34) हा संशयास्पदरित्या आला असता, अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याची धरपकड करुन त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 56 ग्रॅम वजनाचे 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे एमडी (मेफेड्रॉन) हे अंमली पदार्थ सापडले.  

त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोहसिन याच्या जवळ सापडलेले अंमली पदार्थ जफ्त करुन त्याची कसुन चौकशी केली असता, त्याला सदरचे अंमली पदार्थ कळंबोलीत राहणा-या इम्तियाज नियाज अहमद खान (33) याने दिल्याची माहिती दिली. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला देखील ताब्यात घेतले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोहसिन झरीवाला व इम्तीयाज खान या दोघांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाहन चालकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे - पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ