सेक्स्टॉर्शन मधील आरोपी सायबर गुन्हेगारांच्या बालेकिल्ल्यात जेरबंद

नवी मुंबई सायबर पोलिसांची कामगिरी

नवी मुंबई : कोपरखैरणेत राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीला सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात ओढून त्याचे अश्लिल व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्याची भिती दाखवून तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्याला अटक करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून तब्बल ४३ लाख २२ हजार रुपये उकळणाऱ्या टोळीतील एका आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राजस्थान उत्तर प्रदेश सिमेवरील सायबर गुन्हेगारांच्या बालेकिल्ल्यातून अटक केली आहे. हलीम फरीद खान (१९) असे या आरोपीचे नाव असून सायबर पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे. या कारवाईत पोलिसांना आरोपीच्या बँक खातील ४ लाख १२ हजार रुपये गोठवण्यात यश आले आहे.  

या प्रकरणातील टोळीत सहभागी असलेल्या महिलेने मे महिन्यामध्ये कोपरखैरणे परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीसोबत फेसबुकवरुन मैत्री केली होती. त्यानंतर सदर महिलेने व्हॉटस्‌ॲपवरुन संवाद साधुन तक्रादार व्यक्तीसोबत अश्लिल संभाषण करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर सदर महिलेने स्वतः विवस्त्र होऊन तक्रारदार व्यक्तीला देखील विवस्त्र होण्यास भाग पाडले होते. यादरम्यान सदर महिलेने आणि तिच्या सहकाऱ्यांनी तक्रारदार व्यक्तीचे नग्नावस्थेतील व्हिडीओ रेकॉर्ड केले. त्यानंतर सदरचे अश्लिल व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्याची भिती दाखवून तसेच गुन्हा दाखल करण्याची आणि अटक करण्याची धमकी देऊन तक्रारदाराकडून तब्बल ४३ लाख २२ हजार रुपये उकळले होते.

याबाबत नवी मुंबईच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजाजन कदम, पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर, पोलीस शिपाई भाऊसाहेब फटांगरे, महिला पोलीस शिपाई पुनम गडगे आणि त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात करुन तक्रारदाराने आरोपींच्या सांगण्यानुसार ज्या बँक खात्यांमध्ये रक्कम पाठवली होती, त्या बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीची माहिती मिळवली. त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने राजस्थान पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन हलीम फरीद खान याला राजस्थान उत्तर प्रदेश सिमेवरील पालदी या दुर्गम ठिकाणावरील गावातून ताब्यात घेतले.  

त्यानंतर पोलिसांनी या आरोपीची चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याकडून अनेक मोबाईल फोन, विविध मोबाईल कंपन्यांचे सिमकार्ड, विविध बँकांचे एटीएम कार्डस्‌ जप्त केले आहेत. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी आरोपींचे बँक खाती गोठविण्यासाठी पत्रव्यवहार केल्याने या बँक खात्यातून ४ लाख १२ हजार रुपयांची रक्कम गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, सदर गुन्ह्यामध्ये आरोपी राहत असलेल्या गावात तसेच आजुबाजुच्या परिसरातील काही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार सायबर पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचा महाराष्ट्र आणि भारतातील विविध राज्यात दाखल असलेल्या अशाच प्रकारच्या १३ तक्रारीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.  
 
सायबर गुन्हेगार नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, त्यांना व्हॉटस्‌ॲप अथवा इतर पध्दतीने व्हिडिओ कॉल करुन, त्यांना सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात ओढून रेकॉर्डिंग केलेले त्यांचे अश्लिल व्हिडिओ डिलीट करण्याच्या किंवा सदर व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करण्याची भिती दाखवून सदर व्यक्तींकडून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि कोणाच्याही सांगण्यावरुन पैशांचा भरणा करु नये. तसेच टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉटस्‌ॲप तसेच इतर सोशल मिडीया पलॅटफॉर्मवर अनोळखी लोकांकडून येणाऱ्या मेसेजवर उत्तर देवू नये. तसेच अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये. -विशाल नेहूल, सहाय्यक पोलीस आयुवत-आर्थिक गुन्हे शाखा, नवी मुंबई. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बार मालकांडून खंडणी उकळणारा जेरबंद