नातेवाईकाच्या घरातील ३५ तोळे सोने दागिने चोरणारा गजाआड

चोरी केलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश

नवी मुंबई : नातेवाईकांच्या घरी पाहुणा म्हणून जाऊन संधी साधून त्यांच्या घरातील दागिने चोरणाऱ्या ओंकार साळवी (वय-२९) या तरुणाला रबाळे पोलिसांनी रत्नागिरी येथून अटक केली आहे. ओंकार साळवी याने ऐरोली येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी पाहुणचार घेऊन त्यांच्या घरातील तब्बल १७ लाख ५० हजार रुपये किमतीचे ३५ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करुन पलायन केले होते. त्यानंतर ओंकार साळवी याने सदर दागिने चिपळूण मधील दोन फायनान्समध्ये तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. पोलिसांनी ओंकार साळवी याने चोरलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत.

या प्रकरणातील अटक आरोपी ओंकार साळवी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुवयातील कापसाळ येथील रहिवाशी असून, गत ४ डिसेंबर रोजी तो ऐरोली येथे राहणारे अजय खेतले या नातेवाईकांच्या घरी गेला होता. ओंकार साळवी याने अजय खेतले यांच्या घरी दोन दिवस चांगला पाहुणचार घेतला. त्यानंतर त्याने संधी साधून अजय खेतले यांच्या घरातील तब्बल १७ लाख ५० हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन पलायन केले होते. दागिने चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर अजय खेतले यांनी रबाळे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांनी मामाचा मुलगा ओंकार साळवी याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार रबाळे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. या तपासात ‘रबाळे पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दयानंद वणवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण पवार, हेड कॉन्स्टेबल प्रसाद वायंगणकर, पोलीस कॉन्स्टेबल भोपी आदींच्या पथकाने गत आठवड्यात चिपळूण येथून संशयित आरोपी ओंकार साळवी याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अजय खेतले यांच्या घरातून चोरलेले दागिने चिपळूण मधील दोन फायनान्समध्ये तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी चिपळूण येथे जाऊन १७ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ३५ तोळे वजनाचे विविध प्रकारचे दागिने जप्त केले.

या प्रकरणातील अटक आरोपी ओंकार साळवी याने त्याच्या इतर दोन-तीन नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांच्या घरातून देखील दागिने चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे. न्यायालयाने ओंकार साळवी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाहन प्रदूषणाबाबत महापे वाहतूक शाखेकडून जनजागृतीपर कार्यक्रम