महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कासारवडवली गावात तिहेरी हत्याकांड
नवीन पोलीस आयुवतांना सलामी
ठाणे : ७ वर्षांपूर्वी २८ फेब्रुवारी २०१६ रोजी कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीतील कासारवडवली गाव वारेकर कुटुंबातील १४ जणांच्या हत्येने थरारले होते. २१ डिसेंबर २०२३ रोजीच्या अखेरीस कासारवडवली गावात पुन्हा एकदा एकाच कुटुंबातील पत्नीसह दोन मुलांची बॅटने हत्या करुन खुनी पतीने पोबारा केल्याची घटना घडली. मद्यपी पतीने आपल्याच पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचा प्रकार २०२३ मधील मोठी घटना ठरला आहे. तर नवनियुक्त ठाणे पोलीस आयुक्तांना या ट्रिपल हत्या प्रकरणाने सलामी दिली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाणे मध्ये पती अमित बागडी याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर घटनास्थळी दाखल झालेले पोलीस उपायुक्त (परिमंडळ-५) अमरसिंग जाधव यांनी कौटुंबिक वादातून सदर हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
कासारवडवली गावातील घटनेचे फिर्यादी जयवंत निवृत्ती शिंगे (वय-५०) यांनी कासारवडवली पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर घटनास्थळी कासारवडवली पोलीस चक्रावले. रक्ताच्या थारोळ्यात महिला आणि दोन मुले मृतावस्थेत आढळली. आरोपी अमित बागडी याची मृतक पत्नी भावना अमित बागडी (वय-२४), ६ वर्षीय मुलगी खुशी आणि ८ वर्षीय मुलगा अंकुश यांचा हत्या झालेल्यांमध्ये समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. बागडी परिवार मुळचा हरियाणा राज्यातील ईसार जिल्ह्यातील खरडालीपुर येथील आहे. आरोपी अमित बागडी आणि लहान भाऊ विकास बागडी आदी कासारवडवली गावात राहत होते. कासारवडवली गावातच आरोपी अमित बागडी त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासह राहत होता. तर त्याचा सख्खाभाऊ विकास धर्मवीर बागडी कासारवडवली गाव, ठाणे येथे राहत होता. आरोपी अमित याला दारुचे व्यसन जडलेले होते. दारुच्या नशेत आरोपी अमित परिवाराला त्रास देत होता. त्यामुळे भांडणे होत होती. वारंवारच्या भांडणाला कंटाळून संशयित आरोपी अमित याची पत्नी भावना तिच्या दोन मुलासह अमित याच्यापासून लहान दीर विकास बागडी याच्या घरी कासारवडावलीत राहत होती. तर आरोपी अमित बागडी गावी निघून गेला होता.
पत्नी-मुलांना भेटण्याच्या निमित्ताने हत्या
दारुच्या व्यसनामुळे पत्नी आणि मुले दूर गेली. त्यामुळे आरोपी अमित मूळ गावी हरियाणा मध्ये गेला. घटनेच्या तीन दिवसापूर्वी अमित त्याची पत्नी आणि मुलांना भेटण्याच्या बहाण्याने छोट्या भावाच्या घरी आला. २१ डिसेंबर रोजी सकाळी विकास बागडी हाऊसकिपिंगच्या कामासाठी निघून गेला. तेव्हा आरोपी अमित बागडी घरातच होता. त्याने क्रिकेटच्या लाकडी बॅटने डोक्यात प्रहार करुन भावना, मुलगी खुशी आणि मुलगा अंकुश याची हत्या करुन पोबारा केला. कामाला गेलेला विकास सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरी परतला. तेव्हा सदरची घटना उघडकीस आली.
घटनास्थळी पोलीस उपायुक्तांद्वारे पहाणी
सदर हत्या प्रकरणाची फिर्याद देणारे जयवंत शिंगे यांनी कासारवडवली पोलिसांना माहिती दिल्यानंतर कासारवडवली पोलीस आणि पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन कासारवडवली पोलीस ठाणे मध्ये संशयित आरोपी अमित बागडी याच्या विरोधात पत्नी आणि दोन मुले यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी, ‘आरोपीला दारुचे व्यसन होते. कौटुंबिक भांडणातून सदर हत्याकांड झाल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे', असे सांगितले. या प्रकरणी पोलीस मात्र अन्य बाजूनेही तपास करीत आहेत.
७ वर्षानंतर दुसरे कौटुंबिक हत्याकांड
२८ फेब्रुवारी २०१६ रोजी कासारवडवली परिसरात मध्यरात्री मृत्यूचे तांडव झाले होते. एका विकृतीने कुटुंबातील आई-वडील, पत्नी आणि मुलांसह अन्य नातेवाईक अशा १४ जणांची हत्या केल्याचा थरार घडला होता. या घटनेने सात वर्षांपूर्वी कासारवडवली गाव थरारले होते. या घटनेत विकृत आरोपीची बहीण जिवंत राहिलेली असल्याने मृत्यूचे तांडव जगासमोर आले. यात ७ लहान मुले, ६ महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता. त्यानंतर १४ खुनानंतर आरोपी हसन वारेकर याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता २१ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा एकदा कासारवडवली गाव हादरले. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने कासारवडवली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.