बेलापूर आणि कामोठेतून 6 बांग्लादेशी नागरिकांची धरपकड  

नवी मुंबई पोलीस आणि दहशतवाह विरोधी पथकाची कारवाई  

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दहशतवाद विरोधी पथकाच्या विक्रोळी युनिटने बेलापूर मधील शाहबाज गावात तसेच कामोठे भागात छापे मारुन बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या 6 बांग्लादेशी नागरिकांची धरपकड केली आहे. यातील काही बांग्लादेशी नागरीक हे दहा वर्षापासून तर काही पाच ते सहा महिन्यांपासून नवी मुंबईत वास्तव्य करीत असल्याचे तपासात आढळुन आले आहे.  

बेलापूर येथील शाहबाज गाव येथील व्यंकटेश्वर अपार्टमेंटमध्ये काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांना मिळाल्याने त्यांनी सदर माहितीची शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी व त्यांच्या पथकाने गत शनिवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास शाहबाज गावातील व्यंकटेश्वर अपार्टमेंट छापा मारुन सोनाली रिपोन शेख (17), तानीया उर्फ अमिना मोहम्मद अली बेगम (27) या दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी बांग्लादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. तसेच दोघी नवी मुंबई परिसरात मागील 5 ते 6 महिन्यांपासून राहत असल्याचे सांगितले.  

अधिक चौकशीत त्यांच्यासोबत बांगलादेशातून असिम शेख  व त्याची पत्नी हासी हे दोघे आल्याचे व ते सध्या तळोजा फेज-2 मधील एम.एस.बिल्डिंग मध्ये राहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तळोजा भागातील एस.एम.बिल्डींगवर छापा मारुन सदर ठिकाणी राहत असलेल्या असिम इलियास शेख (35) व त्याची पत्नी हासी असिम शेख (24) या बांग्लादेशी दाम्पत्याला  ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेने या चारही बांग्लादेशी नागरिकांविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात भारतीय पासपोर्ट अधिनियम तसेच विदेशी नागरीक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.  

दरम्यान, कामोठे भागात काही बांग्लादेशी नागरीक वास्तव्यास असल्याची माहिती मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाच्या विक्रोळी युनिटला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाच्या विक्रोळी युनिटने बुधवारी रात्री कामोठे पोलिसांच्या सहाय्याने कामोठे सेक्टर-18 भागात सापळा लावला होता. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी खलील मैनुद्दीन सय्यद (30) व हशु मुल्ला हसन शेख (22) हे दोघे संशयास्पदरित्या आले असता, दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते बांग्लादेशी नागरीक असल्याचे तसेच मागील दहा वर्षापासून ते नवी मुंबईत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार या दोन्ही बांग्लादेशी नागरीकांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 कासारवडवली गावात तिहेरी हत्याकांड