चैन स्नॅचींग करणा-या लुटारुंचा पनवेल भागात हैदोस सुरुच  

चार महिलांचे सव्वा दोन लाखांचे दागिने लुटले

नवी मुंबई : पनवेल व कळंबोली भागात चैन स्नॅचींग करणा-या लुटारुंचा हैदोस सुरुच असुन या लुटारुंनी पनवेल, नवीन पनवेल आणि कळंबोली भागातील चार महिलांच्या अंगावरील सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे दागिने लुटून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. या लुटारुंचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असला तरी, त्यांच्या कारवाया वाढतच असल्याने पोलिसांची सुद्धा डोके दुखी वाढली आहे.  

नवीन पनवेल सेक्टर-18 भागात राहणा-या 77 वर्षीय सरोजीनीदेवी साजवान या गत 16 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणा-या महिलेसोबत चालण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या सेक्टर-4 मधून डिमार्ट समोरील मस्जिद येथून चालत जात असताना, एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने सरोजीनीदेवी यांच्या गळ्यातील 1 लाख 15 हजार रुपये किंमतीचे दागिने खेचून पलायन केले. या घटनेत सरोजिनी देवी यांच्या गळ्याला दुखापत झाल्याने त्यांनी आपले घर गाठून रात्री आपल्या कुटुंबियासह खांदेश्वर पोलीस ठाणे तक्रार दाखल केली.  

त्यानंतर त्याच दिवशी पनवेल मधील लाईन प्रभु आळी सोसायटीत राहणा-या सुप्रिया टेंबे (54) या सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वडाळे तलावाकडे पायी चालत जात होत्या. यावेळी त्या उशाप्रभा बिल्डींगजवळ आल्या असताना, त्यांच्या समोरुन मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने सुप्रिया टेंबे यांच्या गळ्यातील सोळा ग्रॅम वजनाचे 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचुन पलायन केले. त्यानंतर पनवेल मधील शिरढोण गावात राहणा-या मिनाक्षी महाजन (41) या सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पनवेल मधील सोसायटी नाका येथून स्टेशनच्या दिशने चालत जात होत्या. याचवेळी सदर लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाचे 70 हजार रुपये सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पलायन केले.  

या घटनेनंतर सोमवारी 18 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास  कळंबोली सेक्टर-20 मधील रोडपाली भागात राहणा-या रत्ना पाटील (52) या आपल्या 3 वर्षीय नातीला सायकल चालविण्यासाठी इमारतीच्या खाली घेऊन गेल्या होत्या. दरम्यान भरधाव मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारु पैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने रत्ना पाटील यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र खेचुन पलायन केले. या चारही घटनांची अनुक्रमे खांदेश्वर, पनवेल शहर व कळंबोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडुन या लुटारुंचा शोध घेण्यात येत आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ६ वर्षात हरविलेले १७०९ मोबाईल तक्रारदारांना परत