नेरुळ भागातील दोन एटीएम मशीन फोडणा-या आरोपीला 24 तासात अटक  

सीसीटिव्ही फुटेजवरून शोध घेऊन आरोपीला नेरुळ पोलिसांनी केले जेरबंद

नवी मुंबई : नेरुळ भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया व डी बी एस या दोन बँकेचे एटीएम मशीन फोडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणा-या चोरट्याला नेरुळ पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे. विशाल रोशनसिंग राय (19) असे या चोरट्याचे नाव असून त्याने गत रविवारी रात्री दोन एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने त्याच्या हाती पैसे लागले नव्हते. त्यामुळे त्याने एका एटीएममधील सुरक्षारक्षकाचा मोबाईल फोन घेऊन पलायन केले होते.  

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी विशाल राय हा डोंबिवली मानपाडा भागात राहण्यास असुन पूर्वी तो कोपरखैरणे येथे राहण्यास होता. सातवी पर्यंत शिक्षण झालेला विशाल हा काहीही कामधंदा करत नसून तो अशाच प्रकारच्या चो-या करत असल्याचे त्याच्या चौकशीत आढळून आले आहे. गत रविवारी मध्यरात्री त्याने नेरुळ सेक्टर-21 मधील एसबीआय व डीबीएस या दोन बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला एटीएम मशीन फोडता आले नाही. सदर मशीन फोडताना आपला चेहरा सीसीटिव्ही कॅमे-यात कैद होऊ नये यासाठी सदर चोरट्याने तोंडावर रुमाल घेतल्याचे तसेच सीसीटिव्ही कॅमे-याची दिशा बदलल्याचे आढळून आले आहे.  

यावेळी या चोरट्याला एटीएम मशीन फोडण्यात यश न आल्याने त्याच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे त्याने एटीएम मशीनवरील सुरक्षारक्षकाच्या बॅगेतील मोबाईल फोन चोरुन पलायन केले होते. या चोरट्याने एटीएम मशीन फोडल्याने सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचे मशीनच्या पार्टचे नुकसान झाल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी निदर्शनास आल्यानंतर नेरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे व निलेश शेवाळे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाने नेरूळ परिसरातील सी. सी. टी. व्ही. फुटेजची पाहणी करुन आरोपी विशाल राय याची माहिती मिळवली.  

त्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरु केला असताना तो दुस-या दिवशी नेरुळ मधील डी.वाय.पाटील स्टेडियम जवळ आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चोकशी केली असता त्यानेच सदरचे एटीएम मशीन फोडल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडुन सुरक्षारक्षाचा चोरलेला मोबाईल फोन हस्तगत केला आहे. या चोरट्या विरोधात अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.   

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

चैन स्नॅचींग करणा-या लुटारुंचा पनवेल भागात हैदोस सुरुच