बांग्लादेशातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुजरात मधून अटक  

पनवेल शहर पोलिसांची कामगिरी

नवी मुंबई : बांग्लादेशातील एका खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने तीन महिन्यांच्या बंधपत्रावर सोडल्यानंतर बांग्लादेशातून फरार झालेल्या आणि घुसखोरीच्या मार्गाने गुजरात मध्ये येऊन लपून राहत असलेल्या बांग्लादेशी आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. रुबेल अनुमिया शिकदेर (वय-२९) असे या आरोपीचे नाव असून, मागील वर्षभरापासून तो गुजरात मधील अहमदाबादमध्ये राहत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.  

पनवेल शहर पोलिसांनी गत ६ डिसेंबर रोजी पनवेलच्या करंजाडे भागातील एम.पी.केशव बिल्डींगमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या अमीनुर रसुल शेख (वय-४१), इबाद अमीर शेख (वय-२९) आणि महिला कोहीनुर अमीर शेख (वय-३६) या तीन बांग्लादेशी नागरीकांना अटक केली होती. या तिघांच्या चौकशीत त्यांना बांग्लादेशातून घुसखोरीच्या मार्गाने भारतात येण्याकरीता रुबेल अनुमिया शिकदेर याने मदत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी आरोपी रुबेल अनुमिया शिकदेर याची गुप्त बातमीदारांद्वारे माहिती काढली असता, तो गुजरात मधील अहमदाबादमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली होती.  

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे, विनोद लभडे आणि त्यांच्या पथकाने अहमदाबाद येथील इसानपुर पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या मदतीने आरोपी रुबेल अनुमिया शिकदेर याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी बांग्लादेशी भाषा अवगत असलेल्या पोलीस मित्रांच्या मदतीने तसेच दुभाषीक यांच्या सहाय्याने रुबेल याची कसून चौकशी केली. तसेच त्याची पूर्व चारित्र्य पडताळणी केली. या तपासणीत आरोपी रुबेल याच्या विरोधात बांग्लादेशातील गोपालगंज पोलीस ठाणे मध्ये डिसेंबर-२०२१ मध्ये पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच बांग्लादेशातील न्यायालयाने रुबेल याला तीन महिन्याच्या बंधपत्रावर मुक्त केल्यानंतर तो बांग्लादेशातून फरार झाला. त्यानंतर त्याने घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन मागील वर्षापासुन तो गुजरातमध्ये भंगार गोळा करण्याचे काम करुन वास्तव्य करत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. पनवेल शहर पोलिसांनी आता खुनाच्या गुन्ह्यातील या आरोपीला बांग्लादेशातील पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. गत महिन्यात देखील पनवेल शहर पोलिसांनी बांग्लादेशातील खुनाच्या गुह्यातील एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी बांग्लादेशातील खुनाच्या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीला अटक केली आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नेरुळ भागातील दोन एटीएम मशीन फोडणा-या आरोपीला 24 तासात अटक