नवी मुंबई मध्ये गुटख्याची सर्रास विक्री  

अन्न-औषध प्रशासनाची गुटखा विक्रेत्या पान शॉपवर छापेमारी

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्यात गुटखा, सुंगधी तंबाखु यासारखे आरोग्यास हानीकारक असलेले पदार्थ विक्रीस आणि बाळगण्यास बंदी असतानाही नवी मुंबई शहरात परराज्यातून गुटखा, सुंगधी तंबाखुसारखे पदार्थ छुप्या पध्दतीने येत असल्याचे आढळुन आले आहे. नवी मुंबई शहरातील पान टपऱ्यांवर अगदी सहजतेने गुटखा, सुगंधीत तंबाखु उपलब्ध होत असल्याचे राज्य अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गत आठवडाभरात नवी मुंबई मधील विविध भागातील ३२ पान शॉपवर केलेल्या कारवायांवरुन दिसून येत आहे. पोलीस तसेच अन्न आणि औषध प्रशासनाकडून गुटखा बाळगणाऱ्या तसेच विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा जप्त केला जात असला तरी गुटख्याची विक्री थांबत नसल्याचे चित्र सध्या नवी मुंबई शहरात दिसत आहे.    

आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे निर्माण होणाऱ्या विकारांमुळे जीवही जातो. त्यामुळे तरुणांना व्यसनाधिनतेपासून दूर ठेवून निरोगी, सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी राज्यात हातभट्टी दारु, गुटखा, मावा आदींच्या विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे या निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आश्रयाखाली अवैध व्यवसाय चालत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.    

इतर राज्यात गुटखा उत्पादनास बंदी नसल्याने या राज्यातून तस्करी करुन खुष्कीच्या मार्गाने विविध वाहनांचा वापर करुन गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थ महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जात असल्याचे पोलीस आणि अन्न-औषध प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध कारवायांवरुन दिसून आले आहे. तस्करी करुन राज्यात आलेल्या गुटखा, सुगंधीत तंबाखु विक्रीची दरवर्षीची उलाढाल कोट्यवधींच्या घरात असल्याचे बोलले जाते. राज्याच्या सीमेवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.   

नवी मुंबई पोलिसांकडून गुटखा आणि इतर तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंधक विरोधी अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवायांअंतर्गत पोलिसांनी गत वर्षभरामध्ये लाखो रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला तसेच इतर तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहेत. तसेच गुटखा विक्रेते आणि पुरवठादारांना अटक केली आहे. मात्र, त्यानंतर देखील नवी मुंबई शहरात छोट्या-छोट्या पान टपऱ्यावर दुकानांमध्ये गुटख्याची खरेदी विक्री सुरुच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नवी मुंबई शहराला गुटखा आणि अंमली पदार्थ मुक्त करण्याचा नारा नवी मुबंई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे नवी मुंबई शहरात अंमली पदार्थ आणि गुटखा तसेच तंबाखुजन्य पदार्थांची खरेदी-विक्री सुरुच असल्याने नवी मुंबई शहर गुटखा आणि अंमली पदार्थ मुक्त कधी होणार?, असा प्रश्न नवी मुंबई शहरातील सुजाण नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.  

 
गत आठवडयाभरामध्ये अन्न-औषध प्रशासन विभागाने गुटखा विक्रेत्यांवर केलेली कारवाई    
राज्य अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गत ११ डिसेंबर रोजी पनवेल शहरातील एकुण ८ पान शॉपवर छापे मारुन हजारो रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधीत तंबाखू जप्त केला आहे. तसेच १३ डिसेंबर रोजी कोपरखैरणे, घणसोली मधील ७ पान शॉपवर तसेच सीबीडीतील ४ पान शॉपवर देखील छापे मारले आहेत. याशिवाय १५ डिसेंबर रोजी पनवेल तालुक्यातील ७ पान शॉपवर तसेच वाशी मधील ६ पान शॉपवर देखील छापे मारुन हजारो रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला आहे. या सर्व पान शॉप चालक मालकांविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाणे मध्ये गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे. तसेच या सर्वांचे पान शॉप सिल केले आहेत. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बांग्लादेशातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुजरात मधून अटक