दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण

अपहरणकर्त्या महिलेला दोन वर्षाचा कारावास

नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकातून दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शेवंता कातकरी (वय-३५) या महिलेला कल्याण रेल्वे न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास एक महिने साधी कैद शेवंता कातकरी हिला भोगावी लागणार आहे. शेवंता कातकरी हिने दीड वर्षापूर्वी पनवेल रेल्वे स्थानकाजवळुन २ वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते.  

मुळचे अमरावती जिल्ह्यातील असलेले ६ जणांचे एक कुटुंब मागील तीन वर्षांपासून पनवेल रेल्वे स्थानक बाहेरील परिसरात राहत होते. १६ जून २०२२ रोजी सदर कुटंब येथील पदपथावर झोपले असताना पहाटे ५.४५ वाजता सदर दाम्पत्य प्रात विधीसाठी गेले होते. यावेळी त्यांची मुले त्याच ठिकाणी झोपली होती. याचवेळी शेवंता कातकरी या महिलेने २ वर्षाच्या मुलाला घेऊन पलायन केले होते. काही वेळानंतर अपह्रत मुलाचे आई-वडिल आपल्या जागेवर आल्यानंतर त्यांचा मुलगा गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर दाम्पत्याने पनवेल रेल्वे स्थानक परिसर तसेच आसपासच्या वस्त्यांमध्ये मुलाचा शोध घेतला. मात्र, मुलगा न सापडल्याने त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे मध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.  

या प्रकरणी पोलिसांकडून अपह्रत मुलाचा शोध सुरु असताना, पनवेल मधील खानावळे वाडी येथे राहणाऱ्या एका कातकरी महिलेच्या घरी अचानक एक लहान मुल आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी खानावळे वाडीत जाऊन पहाणी केली असता, शेवंता कातकरी हिच्या घरात अपह्रत २ वर्षीय मुलगा आढळुन आला होता. त्यानंतर सदर महिलेला पोलिसांनी अटक करुन २ वर्षीय मुलाची सुटका केली होती. या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी शेवंता कातकरी या महिलेविरोधात भीक मागण्याच्या उद्देशाने तिने अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी कल्याण रेल्वे न्यायालयात सुरु होती. या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील जयश्री कोरडे यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले.  

या सुनावणीमध्ये आरोपी महिलेने भीक मागण्याच्या उद्देशाने मुलाचे अपहरण केल्याचे सिध्द झाले नसले तरी तिने पालकांच्या ताब्यातून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याचे उपलब्ध पुराव्यावरुन सिध्द झाले. त्यानंतर न्यायाधीश स्वयंम एस. चोपडा यांनी चिमुकल्याला त्याच्या आई-वडिलांपासून हिसकावून घेणे गंभीर कृत्य असल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपी महिलेला दोन वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम आरोपीने भरल्यानंतर सदर रक्कम तक्रारदार यांना देण्याचेही न्यायालयाने आदेश दिले आहेत. या घटनेतील आरोपी महिलेने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तिला जामीन न मिळाल्याने अद्यापही ती कारागृहात आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई मध्ये गुटख्याची सर्रास विक्री