महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
वेश्वी गावातील २२ भटक्या कुत्र्यांवर ॲसिड हल्ला; ३ कुत्र्यांचा मृत्यू
प्राणी मित्र संघटनांकडुन चिंता व्यक्त
नवी मुंबई : उरण भागात कुत्र्यांना मारण्यासाठी चक्क ॲसिडचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उरण तालुवयातील वेश्वी गावात अज्ञात व्यक्तीने गावात वावरणाऱ्या २२ भटक्या कुत्र्यांवर ॲसिड टाकल्याने त्यातील ३ कुत्र्यांचा मृत्यू तर इतर १९ कुत्रे या ॲसिड हल्ल्यात गंभीररीत्या भाजले असून, त्यापैकी १२ कुत्र्यांवर पनवेल मधील ‘हॅन्डस् दॅट हेल ॲनिमल केअर फाऊंडेशन'च्या शेल्टरमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, उरण पोलिसांनी या घटनेतील अज्ञात व्यक्ती विरोधात महिन्याभरानंतर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
उरण तालुवयातील वेश्वी गावात राहणारे सुनिल मढवी आणि त्यांची पत्नी रश्मीता मढवी आदी दोघेही श्वानप्रेमी असून, त्यांनी आपल्या घरातील टेरेसवर श्वानांकरीता शेल्टर होम तयार केले आहे. त्याचप्रमाणे मढवी दांपत्य गावातील आणि आजुबाजुच्या परिसरातील इतर भटक्या कुत्र्यांना देखील बिस्कीट किंवा इतर खाद्यपदार्थ टाकत असतात. तसेच त्यांच्यावर औषधोपचार देखील करतात. गत २१ नोव्हेंबर रोजी मढवी दाम्पत्याने त्यांच्या घराजवळ जमलेल्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ खाण्यास दिले होते. त्यावेळी सर्व कुत्रे चांगल्या स्थितीत असल्याचे आढळुन आले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी परिसरातील काही कुत्र्यांच्या चेहऱ्यावर जळाल्यासारखी जखम निदर्शनास आली होती. त्यानंतर मढवी दाम्पत्याने वेश्वी गावातील इतर कुत्र्यांची पहाणी केली असता, बऱ्याच कुत्र्यांच्या अंगावर भाजल्याच्या जखमा दिसून आल्या. या घटनेनंतर मढवी दाम्पत्याने पनवेल मधील ‘हँन्डस् दॅट हेल ॲनिमल केअर फाऊंडेशन' या संस्थेच्या संस्थापिका अनामिका चौधरी यांच्या माध्यमातून १२ जखमी श्वानांना तत्काळ कल्हे गावातील त्यांच्या शेल्टरमध्ये उपचारासाठी दाखल केले. उर्वरीत ३ मृत श्वानांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले. ॲसिड हल्ल्यामुळे जखमी झालेले ५ कुत्रे अद्याप त्यांच्या हाती लागले नाहीत. या ॲसिड हल्ल्यातील गंभीररीत्या भाजलेल्या १२ श्वांनावर हँन्डस् दॅट हेल ॲनिमल केअर फाऊंडेशनमध्ये उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे.
दरम्यान, अज्ञात व्यक्तीने अत्यंत क्रुरपणे वेश्वी गावातील २२ कुत्र्यांवर ॲसिड हल्ला करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे आढळुन आल्यानंतर मढवी दाम्पत्याने उरण पोलीस ठाणे मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार उरण पोलिसांनी कुत्र्यांवर ॲसिड हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे.
कुत्र्यांवर ॲसिड फेकण्याचे प्रकार
अंगावर येणाऱ्या, चावा घेणाऱ्या तसेच पाठीमागे लागणाऱ्या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांना काठीने किंवा दगड मारुन हुसकविण्याचे प्रकार होत होतात. काही घटनेत धोकादायक कुत्र्यांना विष घालून मारण्याचे प्रकार देखील घडले आहेत. मात्र, ॲसिड टाकून कुत्र्यांना मारण्याचा तसेच त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने प्राणी मित्र संघटनांकडुन चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अनामिक चौधरी - (संस्थापिका-हॅन्डस दॅट हेल ऍनिमल केअर फाउंडेशन)
महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, त्यासाठी निर्बीजिकरण, लसिकरण सारख्या उपाययोजना कराव्यात, त्यासाठी नागरिकांनी दबाव आणावा पण कुत्र्यांना ठार मारणे, त्यांच्यावर ऍसिडसारखे जीवघ्ोणे पदार्थ टाकणे अमानवीय कृत्य आहे. या घटनेतील श्वानांवर ऍसीड हल्ला करणाऱया व्यक्तीला ऍसीड कसे व कुठून मिळाले? याचा पोलिसांनी शोध घेणे आवश्यक आहे. तसेच असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी अशा आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.