महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
ठाणे ‘लोक अदालत'मध्ये घडला इतिहास
‘राष्ट्रीय लोक अदालत'मध्ये जिल्ह्यातील २१,५७३ न्यायालयीन प्रकरणे निकाली
ठाणे : ‘राष्ट्रीय लोक अदालत'मध्ये ठाणे जिल्ह्यातील न्यायालयात निकालाच्या प्रतिक्षेत असलेली तब्बल २१,५७३ न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. ‘राष्ट्रीय लोक अदालत'मध्ये सर्वाधिक प्रकरणे निकाली काढण्याचा उच्चांक यंदा नोंदविण्यात आलेला आहे. तर राज्यात ठाणे जिल्ह्याचा अव्वल नंबर ठरला. सदर न्यायालयीन प्रकरणात मोटार अपघात प्राधिकरण, वैवाहिक प्रकरणे, धनादेश बाऊन्स, गुन्हा कबुली, दंडात्मक कारवाईत तडजोड, बँक रिकव्हरी प्रकरणे अशी विविध प्रकरणे निकाली काढण्यात यश लाभले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण-नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात चार ‘राष्ट्रीय लोक अदालत'चे आयोजन करण्यात येते. त्यानुसार वर्षाच्या अखेरीस ९ डिसेंबर, २०२३ रोजी शेवटच्या ‘लोक अदालत'मध्ये प्रकरणे निकाली काढण्यात ठाणे जिल्ह्यातून मोठा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण'चे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात एकूण निकाली काढण्यात आलेल्या प्रकारणांपैकी १/४ प्रकरणे ठाणे जिल्ह्यातील असल्याचा उच्चांक गाठला. मागील एक वर्षाच्या ‘लोक अदालत'चा आढावा घेतला असता ठाणे जिल्ह्यातील पक्षकारांनी ‘राष्ट्रीय लोक अदालत'चे महत्व जाणून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यामुळेच न्यायालयात प्रलंबित असलेली ८६,०७४ प्रकरणे निकाली निघालेली आहेत. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा-सत्र न्यायालय ठाणे अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या वतीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त जिल्हा-सत्र न्यायालय आणि तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय आणि इतर न्यायालयांमध्ये प्रभारी प्रमुख जिल्हा-सत्र न्यायाधीश ठाणे आणि ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे'चे प्रभारी अध्यक्ष अमित एम. शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जिल्हा विधी प्राधिकरण'चे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांच्या समन्वयाने ९ डिसेंबर रोजी ‘लोक अदालत'चे आयोजन करण्यात आले होते. ‘राष्ट्रीय लोक अदालत'मध्ये निकाली निघालेली २१,५७३ निकाली प्रकरणे आणि दावा दाखल पूर्व प्रकरणे अशी ४०,०८३ तडजोड पात्र असलेली प्रकरणे पक्षकारांच्या सहमतीने आणि सामंजस्याने निकाली काढण्यात आली.
ठाणे येथील ‘राष्ट्रीय लोक अदालत'मध्ये मोटार अपघातांच्या एकूण २९४ प्रकरणांमध्ये २५ कोटी ९५ लाख ३ हजार ९६० रुपयांची भरपाई दावेदारांना देण्यात आली. तर ‘राष्ट्रीय लोक अदालत'मध्ये एकूण ४०,०८३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.आहे. जिल्ह्यात १ अब्ज ९९ कोटी ४४ लाख १७२ रुपयांची तडजोड करण्यात आले. १०८ वैवाहिक प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. त्यापैकी घटस्फोटापर्यंत गेलेली ५ जोडपी संसाराकडे वळविली गेली. तर धनादेश न वटल्या प्रकरणी कलम १३८ ची ९४५ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये तडजोडीची रक्कम ३२ कोटी ४९ लाख ३७ हजार ९९० रुपये असल्याची माहिती ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण'तर्फे देण्यात आली.
सदर ‘लोक अदालत'मध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम तसेच ठाणे वकील संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व विधीज्ञ सदस्य, सरकारी वकील, वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनय राठोड (ठाणे), नवी मुंबईचे उपायुक्त तिरपती काकडे तसेच पोलीस प्रशासन, बँका, इन्शुरन्स कंपनी, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कर्मचारी, संगणक कक्षातील कर्मचारी यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळालेले आहे.