घरफोडी चोरी करणारी सराईत दुक्कली गजाआड  

चोरी घरफोडीचे 8 गुन्हे उघडकीस आणण्यात न्हावाशेवा पोलिसांना यश  

नवी मुंबई : उरण व जेएनपीटी परिसरात चोरी-घरफोडी करणा-या दोन सराईत चोरटयाना न्हावाशेवा पोलिसांनी अटक केली आहे. मैनुद्दीन इलियास खान (35) व छोटु रामतीरथ केवट (39) अशी या चोरटयाची नावे असून या चोरटयानी न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी घरफोडीचे 8 गुन्हे केल्याचे तपासात आढळुन आले आहे. सदर गुह्यात चोरटयानी वापरलेले वाहन व त्यांनी चोरलेला मुद्देमाल असा सुमारे 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात न्हावाशेवा पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

गत जानेवारी महिन्यामध्ये अज्ञात चोरटयानी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ऍथोरिटीच्या कार्यालयातून वित्त विभागाची महत्वाची शासकीय कागदपत्रे चोरी करुन नेली होती. त्यावेळी न्हावा-शेवा पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन चोरटयाचा शोध सुरु केला होता. या तपासादम्यान गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी आरोपी मैनुद्दीन खान व छोटु केवट या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या कार्यालयातून महत्वाची शासकीय कागदपत्रांची चोरी केल्याचे तसेच त्याशिवाय त्यांनी इतर 6 चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.  

त्यानुसार पोलिसांनी दोन्ही चोरटयाना अटक केल्यानंतर सदर चोरटयानी गुन्हे करण्यासाठी वापरलेले वाहन तसेच वेगवेगळ्या गुह्यामध्ये चोरी केलेला मुद्देमाल असा सुमारे 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुह्यातील आरोपीबाबत कोणत्याही स्वरुपाची माहिती उपलब्ध नसताना, न्हावाशेवा पोलिसांनी या गुह्यातील आरोपींना अटक करुन त्यांनी केलेले 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चोरटयाकडुन आणखी काही चोरी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे परिमंडळ-2चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले. सदरचा गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपक इंगोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, संजय मोहिते, पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे व त्यांच्या पथकाने केली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ठाणे ‘लोक अदालत'मध्ये घडला इतिहास