बेलापूर न्यायालयात कौटुंबिक न्यायालय सुरु

अशीलांची व वकीलांची ठाणे न्यायालयाची पायपीट थांबणार   

नवी मुंबई : शहरी जीवनातील ताणतणाव नात्यावर मोठा परिणाम करत असताना घटस्फोट, नातेसंबंधातील याचिकांचे प्रमाणही वाढते आहे. या पार्श्वभुमिवर कौटुंबिक न्यायालयांची गरज वाढली आहे. हे लक्षात घेऊन बेलापूर येथील न्यायालयात कौटुंबिक न्यायालय सुरु करण्यात आले आहे. शनिवारी या न्यायालयाचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती भारती डांगरे यांच्या हस्ते झाले. येत्या सोमवार पासून या न्यायालयांच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार आणि वाद-तंटयाच्या प्रकरणात आता अशीलांची व वकीलांची ठाणे न्यायालयाची पायपीट थांबणार असून त्यांच्या वेळेची व पैशांची देखील बचत होणार आहे.  

वाढत्या नागरिकरणामुळे नवी मुंबई शहराची लोकसंख्या दिवसेदिवस वाढत आहे. आजघडीला ती सोळा लाखांहून अधिक झाली आहे. नवी मुंबई शहराची लोकसंख्या ज्याप्रमाणे वाढत आहे, त्याप्रमाणे येथे विविध प्रकारच्या गुह्यात देखील वाढ होऊ लागली आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार आणि वाद-तंटेही वाढले आहेत. त्यामुळे बेलापूर येथील न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालय सुरु करण्याची मागणी नवी मुंबईतील वकील संघटनेकडुन करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन तसेच नवी मुंबईतील खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन बेलापूर येथील न्यायालयात गत एप्रिल महिन्यामध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर न्यायालय सुरु करण्यात आले. मात्र कौटुंबिक न्यायालय सुरु करण्यात आले नव्हते.  

अखेर शनिवारी सकाळी बेलापूर न्यायालयातील सहाव्या मजल्यावरील नवी मुंबई कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती भारती डांगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाणे येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित शेटे, नवी मुंबई कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश रचना तेहरा, तसेच नवी मुंबई वकील संघटनेचे अध्यक्ष सुनिल मोकल व इतर जेष्ठ वकील, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. येत्या सोमवार पासून या न्यायालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.बेलापूर न्यायालयात सुरु होणाऱ्या या कौटुंबिक न्यायालयामध्ये ठाणे येथील कौटुंबिक न्यायालयातील सुमारे २ हजार प्रलंबित व सुरु असलेले प्रकरणे वर्ग करण्यात येणार आहेत. कौटुंबिक हिसांचार आणि वाद-तंटयाच्या प्रकरणात उठसूट ठाण्याला धाव घेण्याचा नवी मुंबईकरांचा त्रास वाचणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील अशील आणि वकिलांना देखील दिलासा मिळाला आहे. 

बेलापूर येथील न्यायलयात सुरु होणा-या कौटुंबिक न्यायालयासाठी न्यायाधीशांचे एक पद, प्रबंधक-१, अधीक्षक-१, सहाय्यक अधीक्षक-१, लघुलेखक-१, वरिष्ठ लिपीक-१, लिपीक- ३ व बेलिफ-१ अशा एकुण १० पदांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. तर बाह्ययंत्रणेद्वारे ४ पदांना मंजुरी देण्यात आली असून यात १ वाहन चालक आणि ३ शिपाई / पहारेकरी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विवाह समुपदेशक व त्यांचा सहाय्यभूत कर्मचारी वर्ग म्हणून ४ नियमित पदांना देखील मंजूर देण्यात आली आहे. यात विवाह समुपदेशक-२, लघुलेखक-१, लिपिक-१ यांचा समावेश आहे. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे १ शिपाई पद भरण्यात आले आहे.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

‘सीसीटीएनएस' रँकींगमध्ये नवी मुंबई पोलीस राज्यात प्रथम