‘एनआयए'च्या रडारवर राबोडी

राबोडीतील चांदीवाला अपार्टमेंट मध्ये ‘एनआयए'चा छापा

 ठाणे : ठाणे राबोडी परिसरातील चांदीवाला अपार्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावर राहणाऱ्या अंजुम अली बापे यांच्या घरावर ९ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एनआयए पथकाने छापेमारी करीत चार तास चौकशी केली. तर एनआयए पथकाने काही कागदपत्रांची तपासणी करीत अंजुम अली बापे यांचा मोबाईल जप्त केला आहे. ‘एनआयए'ला अंजुम यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी माहिती असण्याचा संशय आहे. त्यामुळे ‘एनआयए'चे पथक अंजुम अली बापे यांना नोटीस बजावून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास निघून गेले. दरम्यान, ‘एनआयए'च्या छापेमारीमुळे राबोडी परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे.

९ डिसेंबर रोजी पहाटे ४च्या सुमारास ‘एनआयए'चे ४ ते ५ अधिकारी स्थानिक पोलिसांसोबत ठाणे राबोडी परिसरातील नूर मस्जिदच्या बाजुला असलेल्या चांदीवाला अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. त्यावेळी इमारतीखाली राबोडी पोलीस ठाण्याचे १० ते १५ पोलीस अधिकारा-कर्मचारी तैनात होते. ‘एनआयए'चे अधिकारी चांदीवाला अपार्टमेंटच्या पहिल्या माळ्यावर राहणाऱ्या अंजुम अली बापे यांच्या घरी गेले. अंजुम अली बापे पेशाने वास्तुविशारद आहेत. त्यांनी काढलेले अनेक नकाशे, ड्रॉईंग ‘एनआयए'च्या पथकाने तपासले. घरातच पथकाने अंजुम अली बापे यांची चौकशी केली. या चौकशीत काहीच आक्षेपार्ह आढळले नसल्याचे समजते. ‘एनआयए'च्या अधिकाऱ्यांनी अंजुम अली बापे यांचा मोबाईल जप्त केला आहे.

दरम्यान, या धाडसत्राबाबत अंजुम अली बापे यांचा मुलगा अस्जद अंजुम बापे याने ‘एनआयए' पथकाने छापेमारी केली खरी; पण आमच्याकडे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. नोटीस देऊन चार तासानंतर वडिलांचा मोबाईल घेऊन गेल्याची माहिती अस्जद बापे यांनी दिली.


‘एनआयए'ची दोन महिन्यात दुसरी छापेमारी; नागरिकांमध्ये भिती
‘एनआयए'चे पथक दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा राबोडीत दाखल झाले. त्यांनी चांदीवाला अपार्टमेंट मधील अंजुम अली बापे यांना नोटीस बजावत मोबाईल घेऊन गेले. तर दोन महिन्यापूर्वी एनआयए पथकाने राबोडीतील अनिस नरेकर यांना नोटीस बजावली होती. तर नरेकर सिम्मी आणि पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेचे सदस्य असल्याचा  त्यांच्यावर संशय होता. त्यावेळी देखील एनआयएच्या पथकाने अनिस नरेकर यांना नोटीस बजावलेली होती. त्यानंतर पुन्हा ९ डिसेंबर रोजी राबोडीत ‘एनआयए'चे पथक धडकल्याने राबोडीवर संशयाचे धुके पसरलेले आहे. यामुळे राबोडीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

रस्त्यालगत पार्क असलेल्या दुचाकी चोरणा-या चोरट्याला  नेरुळ पोलिसांनी केली अटक