पनवेल आरटीओ मध्ये एजंटचीच भाऊगर्दी

एजंटशिवाय नागरिकांचे कामच होईना!

नवीन पनवेल : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पनवेल सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे. याठिकाणी कोणतेही काम वाढीव पैसे दिल्याशिवाय होत नसल्याचे समोर आले आहे. लायसन्स करता ११०० रुपये शुल्क असताना २५०० रुपये लाचेची मागणी करुन पहिला हप्ता १५०० रुपये स्वीकारताना २४ नोव्हेंबर रोजी आरटीओ एजंट भूषण यशवंत कदम (चिंध्रण) याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणाला दोन आठवडे होऊन देखील कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव तपासात समोर आले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वी देखील येथे कारवाई केलेल्या आहेत. येथे एजंटांविना कार्यालयात काहीही हालत नसल्याचे दिसून येत आहे. पनवेल परिवहन कार्यालय येथील बहुतांशी कामांसाठी अधिकारीच नागरिकांना एजंटकडे पाठवत असल्याचे एका पडताळणी दरम्यान समोर आले आहे. यातून नागरिकांची कामे होतात; मात्र त्यांची लूट केली जात आहे.

पनवेल आरटीओ कार्यालयात पाय ठेवल्यानंतर एजंट मंडळींचाच गराडा पडत असल्याचे दिसून आले. एजंटच्या हाती कागदपत्रे दिल्यानंतर काम नाकारण्याची १०० टक्के भिती नसल्याचे काही उमेदवार सांगतात. वाहनांची नोंदणी, लायसन्स, कर्जाचा बोजा, दंडात्मक कारवाई, अनेक तडजोडीच्या प्रकरणात एजंटशिवाय काम चालत नसल्याचे चित्र आहे. उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या केबिनबाहेर एजंटचा राबता आहे. जशी महागाई सतत वाढते, त्याच पध्दतीने एजंट सतत आपले दर वाढवून लागले आहेत. कोणी अटकाव करत नसल्याने आता एजंट हेच सर्वेसर्वा बनू लागले आहेत. परिवहन कार्यालयाच्या कामकाजाला हातभार लावणारे ३०० हून अधिक एजंट येथे आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयात कोणाला भेटावे, कागदपत्रे काय लागतील ते कळू नये याचीच व्यवस्था असते. साहेब, तुमचे काम करणार नाहीत असे एजंटकडून सांगितले जाते.

बहुतांश नागरिक काम लवकर व्हावे यासाठी वाढीव पैसे देऊन कामे मार्गी लावत आहेत. अधिकाऱ्यांनी एजंटकडे एखाद्या व्यक्तीला पाठवल्यानंतर काही मिनिटात पैसे देऊन ते काम पूर्ण होत असल्याचे दिसून येत आहे. आरटीओ टेस्ट तसेच इतर अनेक कामांसाठी ऑनलाईन सिस्टीम असतानाही आरटीओ कार्यालयातूनच एजंटनाच संपर्क साधण्यासाठी सांगण्यात येते. आरटीओ कार्यालयातील विविध कामांचा प्रवास सांकेतिक चिन्हांवर चालतो. येथे नियमानुसार काम करण्यासाठी बराच कालावधी लागतो. नागरिकांचे काम वेळेवर होत नाही. मात्र, संबंधित काम एजंट आणि कार्यालयातील काही पंटर लिपिकांच्या मदतीने तासाभरात पूर्ण केले जाते.

एकंदरीतच आरटीओ कार्यालयाचा ९० टक्के कारभार एजंटच चालवितात. कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचे आणि लिपिकांचे सबएजंट आहेत. पैसे घेऊन काम करणारे एजंट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती सापडत आहेत. मात्र, येथील अधिकारी मोकाट आहेत. आठवड्यापूर्वी झालेल्या कारवाईमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पनवेल आरटीओवर लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सुरेंद्र प्रकाश निकम याला आणि त्यांचा खाजगी सहकारी सचिन राजाराम भोसले यांना २०१६ मध्ये २३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. नवीन वाहनाचे आरसी बुक आणि फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या हेतूने २५००० रुपयांची लाच त्यांनी मागितली होती. २०१७ मध्ये पनवेल आरटीओ कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंदेश मातबर केवट (रा.मानखुर्द) या एजंटला १५ हजारांची लाच घ्ोताना रंगेहाथ पकडले होते. २०२३ मध्ये दंड भरल्याची पावती आणि लायसन्स परत देण्यासाठी २ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १ हजार रुपये स्वीकारणाऱ्या नवी मुंबई आरटीओ कार्यालयातील सुहास लहू जाधव (३४) आणि शरद कांबळे (४५) दोघा खाजगी एजंटना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

राडारोडा वाहून नेणाऱ्या डम्परवर भरारी पथकाची कारवाई