१८.७४ लाखांची रक्कम हडपणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद

सायबर पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरु  

नवी मुंबई : महापे येथील फार्मा कंपनीच्या बँक खात्याला संलग्न असलेला मोबाईल नंबर बदलून त्याऐवजी दुसऱ्या मोबाईल नंबरची नोंदणी करुन फार्मा कंपनीच्या कॉरपोरेट लॉगईनमध्ये अनाधिकृतरित्या प्रवेश करुन कंपनीच्या खात्यातून तब्बल १८ लाख ७४ हजार रुपये काढून घेणाऱ्या नूर इस्लाम सॅनफुई (२१) या सायबर चोरट्याला नवी मुंबई सायबर पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून जेरबंद केले आहे. पोलिसांनी आता या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे.  

१७ सपटेंबर रोजी सायबर चोरट्यांनी महापे येथील फार्मा कंपनीला एअरटेल कंपनीने दिलेल्या कॉर्पोरेट लॉगईनमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करुन कंपनीच्या बँक खात्याशी संलग्न असलेला मोबाईल नंबर बदलून फार्मा कंपनीच्या २ बँक खात्यातून एकुण १८ लाख ७४ हजार रुपये आरटीजीएस द्वारे हडप केले होते. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर तसेच पोलीस नाईक रविराज कांबळे, पोलीस शिपाई भाऊसाहेब फंटागरे, सचिन पावशे, महिला पोलीस शिपाई पुनम गडगे यांनी तपासाला सुरुवात केली.  

या तपासात सायबर पोलिसांनी फार्मा कंपनीची रक्कम ज्या बँक खात्यामध्ये वळती झाली, त्या खात्यांची माहिती मिळवली. तसेच बँकेशी संलग्न मोबाईल क्रंमाकांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर फसवणुकीकरिता वापरण्यात आलेल्या बँकेच्या खातेदाराने त्याचे बँक खाते, एटीएम, चेकबुक, बँकेशी संलग्न मोबाईल क्रमांक पश्चिम बंगाल येथील व्यक्तीस दिल्याची माहिती तपासामध्ये प्राप्त झाली. या तपासामध्ये प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले असता, आरोपीचे वास्तव्य पश्चिम बंगाल येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून आरोपी नूर इस्लाम सॅनफुई याला ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

 या घटनेत फसवणूक झालेल्या फार्मा कंपनीची रक्कम चार बँक खात्यात वळती झाल्यानंतर आरोपींनी सर्व रक्कम काढून घेतली आहे. त्यामुळे पोलिसांना या गुन्ह्यातील रक्कम हाती लागलेली नाही. या गुह्यातील इतर आरोपी हाती लागल्यानंतर सदर रक्कम हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी सदर गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे.  

सायबर चोरट्यांनी सदर गुन्ह्यामध्ये फार्मा कंपनीच्या बँक खात्याशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक बंद करुन त्याऐवजी आपल्या मोबाईल नंबरची नोंदणी केली. त्यावेळी एअरटेल कडून फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर सिम कार्ड अपडेट करण्यात येत असल्याबाबतचा मेसेज पाठविण्यात आला होता. तसेच सिम कार्ड अपडेट करणे मान्य नसल्यास १२१ क्रमांकावर नो सिम असा मेसेज करण्याबाबतचा मेसेज कंपनीच्या अधिकाऱ्याला प्राप्त झाला होता. मात्र, अधिकाऱ्याने तो मेसेज पाहिला नसल्याने २४ तासानंतर सदर मोबाईल नंबर बंद झाल्यानंतर सायबर चोरट्याकडे असलेला नवीन सिमकार्ड क्रमांक ॲक्टीव झाला. त्यानंतर त्याने कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतल्याचे तपासात आढळून आले आहे. 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ट्रान्सफॉर्मरच्या चोरीच्या घटनेत वाढ