नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन दिवसात 8 अल्पवयीन मुले मुली बेपत्ता?

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने घेतला सर्व मुला मुलींचा शोध  

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गत दोन दिवसामध्ये 5 अल्पवयीन मुली आणि 3 मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने यातील 3 मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. तर तीन मुले मुली हे स्वत:हुन पोलीस ठाण्यात हजर झाले असून इतर दोन मुले मुली यांचा देखील शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध भागातील 12 ते 15 वर्षांची अल्पवयीन मुलं 3 ते 4 डिसेंबर दरम्यान 8 मुले मुली बेपत्ता झाले होते. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी  या अल्पवयीन मुला मुलींचे अपहरण झाल्याप्रकरणी 7 गुन्हे दाखल करुन अपह्रत झालेल्या मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. या गुह्यांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध  कक्षाने तपास सुरु केला होता. या तपासात कोपरखैरणेत बेपत्ता झालेल्या 12 वर्षीय मुलाला त्याच्या वडिलांनी फुटबॉल खेळण्यासाठी परवानगी न दिल्याने तो घरातून रागावून निघून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता, तो ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सापडला असून त्याला कोपरखैरणे पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आले आहे.  

त्याचप्रमाणे रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 13 वर्ष 10 महिन्याच्या मुलीला  तिची आई ओरडल्याने ती घरातून निघून गेली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तीचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला असता ती ऐरोली परिसरात सापडल्यानंतर तिला रबाळे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच कामोठे भागातून बेपत्ता झालेल्या 13 वर्ष 11 महिन्याच्या मुलीचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला असता ती घरातून गुजरात येथे तिच्या मावशीकडे निघून गेल्याचे आढळून आले. या मुलीला वारंवार घरातून निघून जाण्याची सवय असल्याचे निदर्शनास आले असून या मुलीला देखील कामोठे पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.  

कोपरखैरणे भागातून बेपत्ता झालेला 15 वर्षीय मुलगा हा स्वत:हुन आपल्या घरी परतला आहे. कळंबोली भागातून बेपत्ता झालेल्या 12 व 14 वर्षीय दोन मुली विरार येथील जीवदानी मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे उघडकीस आले असून त्या दोन्ही मुली आपल्या घरी परतल्या आहेत. त्याचप्रमाणे रबाळे भागातून बेपत्ता झालेला 13 वर्षीय मुलगा अकोला येथे नातेवाईकांकडे गेल्याचे उघडकीस आले असून तो उद्या पर्यंत नवी मुंबईत पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल भागातून बेपत्ता झालेल्या 16 वर्षीय मुलीचा ठाव ठिकाणा सापडला आहे. सदर मुलीला वारंवार पळून जाण्याची सवय असल्याचे तपासात आढळुन आले आहे.  - अतुल आहेर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष)

 
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील दोन दिवसात अल्पवयीन मुला मुलींच्या अपहरणाचे 7 गुन्हे दाखल झाले होते. वेगवेगळ्या कारणांमुळे हे मुले मुली घर सोडून गेले होते. त्यापैकी 3 ग्ह्यातील अल्पवयीन मुला मुलींचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. तर इतर 5 मुले मुली हे स्वत:हुन बाहेर गेल्याचे व ते स्वत: हजर झाले आहेत.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मुले पळविणारी टोळी सक्रिय