महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी जेरंद
टोळीच्या बँक खात्यातील ८४.९५ लाखांची रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश
नवी मुंबई : टेलीग्रामद्वारे पार्ट टाईम जॉब मिळवून देण्याच्या बहाण्याने जास्त फायदा मिळून देण्याचे प्रलोभन देत वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगून फसवणूक करणाऱ्या टोळीतील त्रिकुटाला नवी मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून १२ मोबाईल फोन, २१ सिमकार्ड, १३ डेबीट कार्ड, ८ चेकबुक, १४ विविध कंपन्यांच्या नावाचे शिक्के, ४ गुमास्ता लायसन्स, ३ उद्यम प्रमाणपत्र जप्त केले आहे. या आरोपींचा आणि त्यांच्या साथीदारांचा देशातील विविध राज्यातील एकुण ५३ सायबर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांना या टोळीच्या बँक खात्यातील तब्बल ८४ लाख ९५ हजाराची रक्कम गोठवण्यात यश आले आहे.
सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये रणविरसिंग नरपतसिंग कानावत (२८), अमरजित प्रकाश यादव (२१) आणि जितेंद्र पुरणचंद मांडैया (२१) या तिघांचा समावेश असून तिघेही राजस्थान मधील आहेत. या आरोपींनी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी नेरुळ येथील हावरे सेंचुरियन मॉलमध्ये एज्युकेशन किट विकण्याच्या बहाण्याने शॉप भाड्याने घेतले होते. त्यानंतर या टोळीने ज्युनिअर एज्युटेक नावाची बोगस कंपनी तयार करुन त्याठिकाणी बोगस कॉल सेंटर सुरु करुन फसवणुकीचे प्रकार सुरु केले होते. नोव्हेंब महिन्यांमध्ये या टोळीने नवी मुंबईतील एका व्यक्तीला टेलिग्रामद्वारे संपर्क साधून त्याला पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली जास्त नफा देण्याचे प्रलोभन दाखविले होते.
त्यानंतर या टोळीने त्याला ऑनलाईन एअरफेअर रिझर्वेशनचे टास्क पूर्ण करण्यास देऊन त्याच्याकडून तब्बल ३२ लाख ६३ रुपये उकळून त्याची फसवणूक केली होती. सायबर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात टोळी विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांनी फसवणूक करण्यासाठी वापरलेले बँक खाते तसेच मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपींचे वास्तव नेरुळ मधील सेंच्युरीयन मॉल येथील असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर सायबर पोलिसांनी दोन पथके तयार करुन सेंच्युरीयन मॉलमध्ये बोगस कॉल सेंटर चालवित असलेल्या तिघांची धरपकड केली. तसेच त्यांच्याकडून १२ मोबाईल फोन, २१ सिमकार्ड, १३ डेबीट कार्ड, ८ चेकबुक, १४ विविध कंपन्यांच्या नावाचे शिक्के, ४ गुमस्ता लायसन्स, ३ उदयम प्रमाणपत्र असा मुद्देमाल जप्त केला.
सायबर पोलिसांनी आता या टोळीतील मुख्य आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय आयरे, पोलीस शिपाई अमोल कर्डिले आणि पोलीस शिपाई पुनम गडगे यांनी करुन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.
आरोपींची गुन्हे करण्याची पध्दत...
या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी आणि त्यांचे साथीदार नवनवीन ठिकाणी मॉलमध्ये शॉप भाड्याने घेवून सदर शॉपच्या पत्त्याच्या आधारे बोगस कंपनीच्या नावाने उदयम तसेच गुमस्ता लायसन्स काढून घेत होते. तसेच त्याच्या आधारे विविध बँकांमध्ये करंट खाते उघडून सदर बँक खात्याचा सायबर फ्रॉड करण्यासाठी वापर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यांमध्ये आरोपींनी नेरुळ येथील हावरे, सेंच्युरीयन मॉलमध्ये एज्युकेशन किट विकण्याच्या बहाण्याने ज्युनिअर एज्युटेक नावाची बोगस कंपनी तयार करुन त्याद्वारे सायबर गुन्हे केल्याचे आढळून आले आहे.
अटक आरोपींविरुध्द दाखल गुन्हे...
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात नाशिक सायबर पोलीस ठाणे, डोंबिवली पोलीस ठाणे, हुडकेश्वर पोलीस ठाणे तसेच हरियाणा राज्यातील बलाबव्हर सायबर पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात आढळून आले आहे. या आरोपींचा महाराष्ट्रातील ९ तसेच संपूर्ण देशातील विविध राज्यातील ४७ अशा एकुण ५६ सायबर सायबर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींची १३ बँक खाते गोठविली...
या प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदाराने ज्या बँक खात्यात रक्कम भरली होती, ते सर्व बँक खाते गोठविण्याबाबत सायबर पोलिसांनी तात्काळ पत्रव्यवहार केल्याने या बँक खात्यातील एकुण ८४ लाख ९५ हजाराची रक्कम गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. या टोळीची एकुण १३ बँक खाते पोलिसांनी गोठवले असून त्यापैकी एकच खात्यातून मोठी रक्कम हाती लागली आहे. मात्र, इतर खात्यातून सुध्दा मोठी रक्कम पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
टेलिग्राम, इंस्टाग्राम तसेच इतर सोशल मिडीयावर पार्ट टाईम नोकरीबाबत आलेल्या जाहिरातींची खात्री करा, त्यांना आपली कोणतीही वैयक्तीक माहिती देऊ नका. तसेच त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार करु नका. सोशल मिडीयाद्वारे आलेल्या कोणत्याही र्अमिषाला बळी पडू नका, असे फसवणुकीचे प्रकार आढळून आल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे संपर्क साधावा. -अमित काळे, पोलीस उपायुवत-गुन्हे शाखा, नवी मुंबई.