महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
रात्री-अपरात्री चालणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या गाड्यांवर कारवाई
अंडा भुर्जी, पाणीपुरी, चायनीज, आईक्रीम अशा प्रकारच्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या गाड्यांवर कारवाईला सुरुवात
नवी मुंबई ः नेरुळ मधील डी.वाय.पाटील हॉस्पीटलच्या गेटवर अंडा भुर्जी, नारळ पाणी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये झालेल्या वादातून ॲम्ब्युलन्स चालकाची हत्या झाल्याची घटना घडल्यानंतर नेरुळ पोलिसांनी आपल्या हद्दीत रात्री अपरात्री चालणारे अंडा भुर्जी, पाणीपुरी, चायनीज, आईक्रीम अशा प्रकारच्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या गाड्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. २९ नोव्हेंबर रोजी रात्री नवी मुंबई महापालिका विभाग कार्यालय आणि नेरुळ पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुळ पश्चिम भागात रात्री-अपरात्री चालणाऱ्या अंडा भुर्जी, चायनीज, पाणीपुरी, आईस्क्रीम अशा अनधिकृत फेरीवाल्यांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली.
नेरुळ मधील डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या गेटवर नारळपाणी आणि अंडाभुर्जीचा स्टॉल लावण्याच्या वादातून ॲम्ब्युलन्स चालकाची निर्घुणपणे हत्या झाल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती. या घटनेनंतर नेरुळ भागात रात्री-अपरात्री अनधिकृत अंडाभुर्जी, चायनीज, पाणीपुरी, आईस्क्रीमच्या गाड्या लावणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर विक्रेते फुटपाथ अडवून गॅस सिलेंडरचा बेकायदेशीररित्या वापर करुन भररस्त्यात अनधिकृतपणे अंडाभुर्जी, चायनीच, वडापाव आणि इतर प्रकारचे व्यवसाय चालवून नागरिकांचा जीव धोक्यात घालत असल्याचे आढळून आले आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांच्या गाड्यांवर रात्री-अपरात्री गर्दुल्ले, नशापाणी करणाऱ्यांची गर्दी होत असल्याने तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्यांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असतात.
दिवसेंदिवस या फेरीवाल्यांमध्ये वाढ होत असल्याने अशा ठिकाणी एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता देखील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. २६ नोव्हेंबर रोजीन रात्री ॲम्ब्युलन्स चालकाची हत्या झाल्यानंतर नेरुळ भागात भररस्त्यात अनधिकृतपणे रात्री-अपरात्री विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. त्यासाठी नेरुळ पोलीस ठाणे आणि महापालिका बी-विभाग कार्यालय यांच्या वतीने संयुक्तरित्या २९ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० ते पहाटे दिड वाजेपर्यंत सदर कारवाई करण्यात आली.
नेरुळ रेल्वे स्टेशन पश्चिम बाजुकडील पाकर्िंग परिसर, एल.पी. ब्रीजजवळ, राजीव गांधी ब्रीजखाली, सेक्टर-२३ जुईनगर या भागात रात्री-अपरात्री चालणारे अनधिकृत फेरीवाले, अंडाभुर्जी, चायनिज, पाणीपुरी, आईस्क्रीमच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्या सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत महापालिका बी विभाग कार्यालयाचे वॉर्ड आधिकारी आणि कर्मचारी, त्याचप्रमाणे नेरुळ पोलीस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी आणि १५ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.