देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुस बाळगणारा तरुण अटकेत      

बेकायेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी गव्हाण येथील तरुण अटकेत    

नवी मुंबई : गव्हाण गावच्या स्मशानभुमीजवळ देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुस घेऊन आलेल्या तरुणाला न्हावाशेवा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सापळा लावुन अटक केली आहे. अजय बलवान सरपटा (22) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळ असलेले देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुस जप्त केले आहे. या तरुणाने सदरचे पिस्तुल कुठून व कशासाठी आणले याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.      

गव्हाण गाव येथील स्मशानभुमीलगत एक तरुण बेकायदेशीर पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती न्हावाशेवा पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजिव धुमाळ यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे व त्यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास गव्हाण गाव येथील स्मशानभुमीजवळ सापळा लावला होता. सदर ठिकाणी अजय सरपटा हा संशयास्पदरित्या फिरताना आढळुन आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.  

यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या जवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुस आढळुन आले. सदर पिस्तुलबाबत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर न्हावाशेवा पोलिसांनी अजय सरपटा याच्या विरोधात बेकायेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. तसेच त्याच्याजवळ सापडलेले पिस्तुल व दोन जिवंत काडतुस जफ्त केले आहे. या तरुणाने सदरचे पिस्तुल कुठून व कशासाठी आणले याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.      

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

रात्री-अपरात्री चालणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या गाड्यांवर कारवाई