महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
ऑनलाईन १८ लाख ५८ हजार रुपये उकळणाऱ्या सायबर टोळीतील एक आरोपी अटकेत
पोलिसांनी वेळीच बँक खाती गोठविल्यामुळे ११ लाख १० हजार रुपये वाचविण्यात यश
नवी मुंबई : टेलीग्रामद्वारे पार्ट टाईम जॉब मिळवून देण्याच्या बहाण्याने टास्क पूर्ण केल्यास जास्त फायदा मिळून देण्याचे प्रलोभन दाखवून एका व्यक्तीकडून तब्बल १८ लाख ५८ हजार रुपये उकळणाऱ्या सायबर टोळीतील एका आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सुभाष भरतलाल प्रजापती (४७) असे या सायबर चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याला नागपूर येथून अटक केली आहे. सायबर पोलिसांनी आता या टोळीतील इतर फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. या कारवाईत सायबर पोलिसांनी वेळीच बँक खाती गोठविल्यामुळे या गुन्ह्यातील ११ लाख १० हजार रुपये वाचविण्यात यश आले आहे.
या प्रकरणातील सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला गत जुलै महिन्यात टेलिग्रामद्वारे संपर्क साधून त्याला पार्ट टाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला टास्क पुर्ण केल्यास जास्त फायदा मिळुन देण्याचे प्रलोभन दाखवुन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्याला वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने टप्या टप्याने रक्कम पाठविण्यास भाग पाडले होते. सायबर चोरटयांनी अशा पद्धतीने तक्रारदाराकडून एकूण १८ लाख ५८ हजार रुपये उकळल्यानंतर त्याला मूळ रक्कम व नफा न देता, त्याच्याकडून आणखी रक्कम मागण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार सायबर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करून तक्रारदाराने फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँक खाते गोठविण्याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हयात वापरलेले बॅक खाते व मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून माहिती काढली असता, या सायबर टोळीतील संशयीत आरोपी नागपूर येथील लष्करी बाग येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उप निरीक्षक सचिन गिड्डे व त्यांच्या पथकाने नागपुर येथे गोपनियरीत्या शोध घेऊन आरोपी सुभाष प्रजापती याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचा या गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला अटक केली.
नवी मुंबई सायबर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा देशातील २६ राज्यामधील सायबर तक्रारीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने त्याच्या साथीदारासोबत मिळुन वेगवेगळया बॅकेमध्ये खाते उघडले असुन सदर खाते हे फसवणुकी करिता वापरले जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार सायबर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. - सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड (गुन्हे शाखा नवी मुंबई)