खारघर रेल्वे स्थानकावर ९८ दुचाकी वाहन चालकांना दंड

वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई

खारघर : खारघर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकांसाठी राखीव असलेल्या जागेत दुचाकी वाहने उभी करणाऱ्या ९८ दुचाकी वाहन धारकांवर खारघर वाहतूक पोलिसांनी इ चलनद्वारे दंडात्मक कारवाई केल्याने दुचाकी चालकांचे धाबे दणाणले आहेत.

खारघर रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर प्रवाशांना  रिक्षा स्थानकावर जाता यावे यासाठी ‘सिडको'ने रिक्षाचालकांसाठी खारघर रेल्वे स्थानकावरील प्रवेश मार्गालगत आणि तिकीट खिडकीच्या समोरील भागात रिक्षा चालकांसाठी वाहनतळ उभारण्यात आले आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी रेल्वे स्थानकावरील छतावर आणि स्थानकाच्या समोरील बाजूला वाहनतळ उभारण्यात आले आहे. दुचाकी वाहनचालक वाहनतळ मध्ये दुचाकी उभी न करता रिक्षा चालकांसाठी राखीव असलेल्या वाहनतळ जागेत दुचाकी उभी करुन नोकरी आणि व्यवसायासाठी जात आहेत. वाहनतळ जागेत उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे प्रवासी तसेच रिक्षा चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदर समस्या ‘खारघर वाहतूक शाखा'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काने यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ३१ ऑवटोबर रोजी पोलीस उप निरीक्षक एस. बी. शिंदे, पोलीस कर्मचारी एस. एम. यादव, बी. एस. साळुंखे, ए. एस. वाघ आदींच्या पथकाद्वारे ९८ दुचाकी वाहनांवर इ चलनद्वारे दंडात्मक कारवाई केल्याने रिक्षा चालक समाधान व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, रांगेत रिक्षा उभी न करता रस्त्यावर रिक्षा उभी करुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाहेरील रिक्षा चालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे, असे रिक्षा चालकांनी सांगितले.
खारघर रेल्वे स्थानकावरील रिक्षा वाहनतळ मध्ये दुचाकी उभी करुन दुचाकीस्वार प्रवासासाठी जात असल्यामुळे रिक्षा वाहनतळ मध्ये पार्क करण्यात येणाऱ्या दुचाकींवर कारवाई करावी, यासाठी अनेक वेळा खारघर वाहतूक पोलीस शाखेत लेखी तक्रार करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी प्रथमच रिक्षा वाहनतळ मध्ये दुचाकी उभी करणाऱ्या वाहन चालकांवर मोठया प्रमाणात कारवाई केल्याने रिक्षा चालक समाधान व्यक्त करीत आहेत. - किसन म्हात्रे, पदाधिकारी - एकता रिक्षा संघटना, खारघर. 

 

--

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीचे अमिष दाखवून डॉक्टरला लुबाडल्याची घटना उघडकीस