सीसीटीव्ही कॅमेरे बनले मदतनीस

‘सीसीटिव्ही'मुळे तब्बल ३६२ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश  

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे शहरात घडणारे विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यात तसेच या गुन्ह्यातील आरोपांना पकडण्यात पोलिसांना मदतगार ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लावण्यात आलेल्या तब्बल ८०३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मागील सहा वर्षात घडलेले तब्बल ३६२ महत्वाचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत परिमंडळ-१ मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या वतीने २७९ तर परिमंडळ-२ मध्ये ‘सिडको'च्या वतीने ५२४ अशा ८०३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा शहरातील मुख्य चौक, जास्त वर्दळीची ठिकाणे, प्रवेशद्वार, बसडेपो, रेल्वे स्थानक परिसरात बसविण्यात आले आहेत. त्यात आता परिमंडळ-१ मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नव्याने अद्ययावत अशा आणखी १२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भर पाडणार आहे.

‘सीसीटिव्ही'च्या या अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीचे नियंत्रण सीबीडी येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील मुख्य नियंत्रण कक्षातून करण्यात येत आहे. नवी मुंबई शहरात लावण्यात आलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे विविध प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे आणि घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत होत आहे. तसेच अनेक गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही फुटेज उपयुक्त सिध्द झाले असून अनेक गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना योग्य दिशा देखील मिळाली आहे.

 नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ मधील ऐरोली ते सीबीडी-बेलापूर या नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये २०१८ पासून ते सप्टेंबर २०२३ या सहा वर्षामध्ये घडलेल्या विविध गुन्ह्यांशी आणि घटनांशी संबधित तब्बल ९५७ सीसीटीव्ही फुटेजची मागणी विविध पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्ही कमांडींग सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांंकडून यातील ५१४ सीसीटीव्ही फुटेजचे शोध घ्ोण्यात येऊन ते पुढील तपासासाठी विविध पोलीस ठाण्यांना देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी यातील ३४८ सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ६४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले आहेत.  

तर परिमंडळ-२ मधील खारघर, तळोजा, कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल, उरण आदि भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गत ६ वर्षामध्ये विविध प्रकारचे २९८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. परिमंडळ-२ च्या हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून २०१८ ते सप्टेंबर २०२३ या सहा वर्षाच्या कालावधीत विविध गुन्ह्यांशी संबधित ३०३ सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली होती. यातील २७९ सीसीटीव्ही फुटेज शोधून पुढील तपासासाठी देण्यात आल्यानंतर परिमंडळ-२ मधील विविध पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांशी संबधित २७९ सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने २४ गुन्हे उघडकीस आणण्यात तसेच या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

‘सीसीटिव्ही'मुळे उघडकीस आलेले महत्वाचे गुन्हे...
बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक साहुजी मंजेरी (पटेल) यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार करुन त्यांची भररस्त्यात हत्या करुन पलायन केले होते. मार्च महिन्यात नेरुळमध्ये सदर घटना घडली होती. या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चांगलीच मदत झाली आहे.

 तसेच डिसेंबर २०२२ मध्ये पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ घडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने लावला होता. त्याप्रमाणे वाशीतील जागृतेश्वर तलावालतच्या कांदळवनात आपल्या मित्रांच्या संगनमताने लैंगिक अत्याचार करुन घेणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्तीचा सामुहिक अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा बनाव पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आणला होता.  

त्याशिवाय नवी मुंबई शहरात घडणारे वाहन चोरी, चेन स्नॅचींगच्या गुन्ह्यांवेळी आरोपींकडून वापरण्यात आलेल्या वाहनांचे नंबर शोधण्यात सीसीटीव्ही फुटेजची चांगली मदत झाली आहे. त्यामुळे अनेक वाहन चोरी आणि चेन स्नॅचींग मधील आरोपींना पकडण्यात देखील पोलिसांना मदत झाली आहे, अशी माहिती वायरलेस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गिरीष ठाकरे यांनी दिली. 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

खारघर रेल्वे स्थानकावर ९८ दुचाकी वाहन चालकांना दंड