दिवसा घरफोडी करणा-या सराईत चोरटयाला नेरुळ पोलिसांनी केली अटक  

10 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश  

नवी मुंबई : नेरुळ परिसरात दिवसा घरफोडी करणा-या एका सराईत चोरटयाला नेरुळ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. नितीशकुमार रामचंद्र दास (24) असे या चोरटयाचे नाव असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करुन सलग 4 महीने या आरोपीवर दिवस रात्र पाळत ठेवुन त्याला उलवे परीसरातून अटक केली आहे. या चोरटयाच्या चौकशीत त्याने नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले 12 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी या गुह्यातील 10 लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी नितीशकुमार दास हा मजुर म्हणुन काम करत होता. तसेच दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यानंतर तो गावठाणात फिरुन कुलूप बंद असलेल्या घरांचा शोध घेऊन सदर घर फोडून त्यातील किंमती ऐवज चोरुन नेत होता. अशा पद्धतीने या चोरटयाने गत 10 महिन्यामध्ये नेरुळ भागात दिवसा 12 घरफोडया करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. नेरुळ भागात घरफोडयाचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, निलेश शेवाळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्हयाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन सलग 4 महीने आरोपी नितीशकुमार ये-जा करत असलेल्या मार्गावर दिवस रात्र पाळत ठेवली. त्यानंतर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन त्याचा माग काढला असता, तो उलवे परीसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला गत 22 ऑक्टोबर रोजी उलवे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने नेरुळ भागात 12 घरफोडया केल्याचे तपासात आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याकडून सोने, लॅपटॉप, हार्डडिस्क तसेच चोरीचे दागिने विकुन घेतलेली मोटारसायकल असा एकूण 10 लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.  

चोरी केलेल्या ऐवजाची बिहारमध्ये नेऊन विक्री  
आरोपी नितीशकुमार हा घरफोडी केल्यानंतर चोरीचा ऐवज घेऊन आपल्या मुळ गावी बिहार दरभंगा येथे पळून जात होता. त्यानंतर तेथे चोरलेल्या सामानाची विक्री करुन मिळालेल्या पैशातून आपल्या मित्रांसोबत पार्टी करुन मौज मजा करत होता. त्यामुळे आपल्या गावातील तरुणांचा तो आवडता मित्र होता. या चोरटयाने चोरलेल्या मुददेमालातील काही रक्कम अय्याशी करण्यात व जुगार खेळण्यात संपविल्याचे तपासात आढळुन आले आहे. तसेच काही मुद्देमाल त्याने त्याचा मित्र सुंदरकुमार याच्याकडे दिल्याचे सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी सुंदरकुमार याचा शोध सुरु केला आहे.  - पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे (परिमंडळ-1)

या सराईत चोरटयाने नेरुळच्या हद्दीत केलेले 12 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून या चोरटया विरोधात वडखळ, एनआरआय आणि उत्तर प्रदेश मधील नोएडा सेक्टर-6 या पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या चोरटयाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्याची चौकशी करण्यात येत आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सीसीटीव्ही कॅमेरे बनले मदतनीस