देवी विसर्जनाच्या दिवशी नवी मुंबईत जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी  

नवी मुंबई वाहतुक विभागाकडून अधिसुचना जारी    

नवी मुंबई : देवी विसर्जनाच्या दिवशी वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई व ठाणे शहरात जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई पोलिसांनी देखील देवी विसर्जनाच्या दिवशी आपल्या हद्दीतील सर्व मार्गावर जड अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. तसेच या कालावधीत रस्त्यावर वाहने उभी करण्यास देखील बंदी घातली आहे. नवी मुंबई वाहतुक नियंत्रण विभागाचे पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी या बाबतची अधिसुचना जारी केली आहे.  

मंगळवारी 24 ऑक्टोबर रोजी देवीचे विसर्जन होणार असून या विसर्जनाच्या दिवशी वाहतूक तसेच देवी विसर्जन मिरवणुका सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी व ठाणे पोलिसांनी वाहतुक नियंत्रण अधिसुचना आदेश जारी करुन आपल्या हद्दीत जड अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. मुंबई व ठाणे पोलिसांनी जारी केलेल्या अधिसुचनेमुळे देवी विसर्जनाच्या दिवशी सर्व जड अवजड वाहने नवी मुंबई शहरातील सर्व रस्त्यावर पार्क केले जाण्याची शक्यता आहे. या वाहनांमुळे नवी मुंबई शहरात मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.  
त्यामुळे नवी मुंबई वाहतुक नियंत्रण विभागाने देखील अधिसुचना जारी करुन देवी विसर्जनाच्या दिवशी 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत नवी मुंबईच्या हद्दीतून मुंबई व ठण्याच्या हद्दीत जाणाऱया तसेच मुंबई व ठाण्याच्या हद्दीतून नवी मुंबईत प्रवेश करणा-या सर्व जड व अवजड वाहनांना प्रवेश करण्यास निर्बंध घातले आहेत.  

तसेच सदर वाहनांना नवी मुंबई आयुक्तालय हद्दीमध्ये रस्त्यावर उभे राहण्यासही बंदी घालण्यात आल्याचे नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी सांगितले. सदरची अधिसुचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरखैरणेतील नटराज या लेडीज बारवर पोलिसांचा छापा