ऑनलाईन ६.६२ कोटी रुपये उकळणाऱ्या टोळीतील दुवकल जेरबंद

३२.६६ कोटींची रक्कम फ्रिज करण्यात सायबर पोलिसांना यश

नवी मुंबई : क्रिपटो करन्सी मध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून तब्बल ६ कोटी ६२ लाख २० हजार रुपये ऑनलाईन लुबाडणाऱ्या टोळीतील दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी घाटकोपर येथून अटक केली आहे. बाळू सखाराम खंडागळे (४२) आणि राजेंद्र रामखिलावन पटेल (५२) अशी या दोघांची नावे असून सायबर चोरट्यांनी या दोघांच्या बँक खात्याचा फसवणुकीसाठी वापर केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांनी फसवणुकीसाठी वापरलेली विविध बँक खाती गोठवून तब्बल ३२ कोटी ६६ लाख १२ हजार रुपये फ्रिज केले आहेत. सायबर पोलिसांनी आता या गुन्ह्यातील मुख्य आरोपींचा शोध सुरु केला आहे.  

सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एप्रिल महिन्यामध्ये अर्चना नायर नावाने एका महिलेला संपर्क साधून क्रिपटो करन्सी मध्ये गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवले होते. तसेच त्यांच्याकडून ६ कोटी ६२ लाख २० हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक केली होती. याबाबत सायबर नवी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी फसवणुकीची रक्कम गेलेली सर्व बँक खाती गोठविण्यासाठी बँकांकडे पत्रव्यवहार केले होते. त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या टोळीने फसवणुकीसाठी वापरलेली विविध बँक खाते गोठवले गेल्याने तब्बल ३२ कोटी ६६ लाख १२ हजाराची रक्कम फ्रिज  करण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.  

या गुन्ह्यांमध्ये सायबर गुन्हेगारांनी वापरलेले बँक खाते क्रमांक तसेच मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले असता संशयीत व्यक्ती घाटकोपर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने सायबर पोलिसांनी घाटकोपर परिसरात शोध घ्ोवुन बाळू खंडागळे आणि राजेंद्र पटेल या दोघांना अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीत त्यांनी पैशाच्या लोभापायी आपले बँक खाते तसेच बँक खात्याशी संलग्न मोबाईल क्रमांक, चेकबुक, एटीएम कार्ड सायबर गुन्हेगारांना दिल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच दोन्ही आरोपी परराज्यातील अन्य संशयित आरोपींच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 त्यावरुन सायबर पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य सायबर गुन्हेगारांचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्याच्या विशेष तांत्रिक तपासाची कामगिरी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पहिल्या सायबर गुन्हे विश्लेषण करणाऱ्या महिला पोलीस पुनम गडगे यांनी केली आहे. सदरचा आव्हानात्मक गुन्हा सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षख गवते, पोलीस शिपाई गुजर, बुरुंगले तसेच महिला पोलीस शिपाई पुनम गडगे आदिंच्या पथकाने उघडकीस आणला आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

देवी विसर्जनाच्या दिवशी नवी मुंबईत जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी