भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या ८ घर मालकांविरुध्द गुन्हे

घर मालकांनी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याचे पोलिसांकडून आवाहन  

नवी मुंबई : घरमालकाने त्यांच्या घरामध्ये ठेवलेल्या भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास कळविणे बंधनकारक असताना, उलवे भागातील ८ घर मालकांनी आपल्या घरामध्ये परदेशी नागरिकांना भाडोत्री म्हणून ठेवून त्यांची माहिती स्थानिक पोलिसांना दिली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी या सर्व घरमालकांविरुध्द सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्यावर पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत उलवे, खारघर, कोपरखैरणे, कामोठे आणि इतर भागात आफ्रिकन देशातील नागरिक तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररित्या रहात असल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यातील अनेक परदेशी नागरिक गुन्हेगारी कारवायांमध्ये तसेच अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई या अभियान अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या विशेषतः परदेशी नागरिकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. या अभियान अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी गत आठवड्यात उलवे नोडमध्ये एकाचवेळी १२ ठिकाणी धाड टाकुन १५ परदेशी नागरिकांची धरपकड केली होती. यातील एका आफ्रिकन (नायजेरीयन) नागरिकाकडून पोलिसांनी एकूण ८४ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते.

 पोलिसांनी या कारवाईत पकडलेले १५ परदेशी नागरिक पासपोर्ट आणि व्हिजाशिवाय बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या सर्वांविरोधात एनआरआय पोलिसांनी विदेशी व्यक्ती अधिनियम तसेच पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन त्या सर्वांना अटक केली आहे. विशेष म्हणजे सर्व परदेशी नागरिक ज्या पलॅटमध्ये रहात होते, त्या घर मालकांनी त्यांच्या घरामध्ये ठेवलेल्या या परदेशी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास कळविणे बंधनकारक होते. मात्र, या घर मालकांनी  परदेशी भाडोत्रींची माहिती स्थानिक पोलिसांना दिली नसल्याचे तसेच अनेक घर मालकांनी या परदेशी नागरिकांची कोणतीही माहिती घेतली नसल्याचे तपासात आढळून आले आहे.  

या प्रकरणातील सर्व घर मालकांनी आपल्या घरामध्ये ठेवलेल्या परदेशी भाडेकरुंची माहिती पोलिसांना न दिल्याने त्यांनी सरकारी आदेशाचा भंग केल्याने एनआरआय पोलिसांनी या ८ घरमालकांविरोधात भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे. या कारवाईत गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये पुष्पा राठोड, किरण राठोड, चैथुबाई कोळी, बाळु गजगे, अशोक जानकर, आशिष धिर, अपर्णा गोंधळी, समीर देशमुख यांचा समावेश आहे.  

भाडेकरुने दिलेल्या कागदपत्रांबाबत संशय वाटल्यास त्याचप्रमाणे बांग्लादेशी अथवा परदेशी नागरिक असल्यास तसेच भाडेकरु गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाटल्यास घर मालकाने याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित भाडेकरुकडून एखादा अपराध घडल्यास घर मालकाला दोषी ठरविले जाऊ शकते. त्यामुळे घर मालकांनी घर भाड्याने देताना आपल्याकडील भाडेकरुची माहिती आवश्यक कागदपत्रांसह स्वतःकडे ठेवावी. तसेच त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे स्वतः जाऊन किंवा ऑनलाईन नोंद करावी. -संजयकुमार पाटील, पोलीस उपायुवत (मुख्यालय), नवी मुंबई. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अश्विनी बिद्रे हत्याकांड