नवी मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ  

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे ‘सायबर सुरक्षा जागरुकता अभियान'

नवी मुंबई : लोकांकडून इंटरनेटच्या वापरात एकीकडे वाढ होत असतनाच सायबर संबंधित गुन्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षी २०२२ मध्ये एकूण २०७ गुन्हे दाखल झाले असून त्यातील केवळ ५४ गुन्हेच उघडकीस आले होते. तर २०२३ या वर्षात मागील नऊ महिन्यामध्ये २२५ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच यातील फक्त ४२ गुन्हेच उघडकीस आले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये सायबर गुन्हेगारांनी कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सायबर गुन्ह्यात होत असलेली वाढ लक्षात घेता, नवी मुंबई पोलिसांनी या गुन्हेगारांचा शोध घेण्याबरोबरच नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्याशी संबंधी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या नागरिकांमध्ये इंटरनेटच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. हीच संधी साधून सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करत असल्याचे आढळून आले आहे. यात इन्शुरन्स, पॉलिसीच्या बहाण्याने, सेक्सटॉर्शन, बँक फ्रॉड, क्रिप्टो ट्रेडींग, क्रेडीट कार्ड, जॉब टास्क, तोतयागिरी, आर्मी अकाऊंट, लोन ॲप, लाईट बिल, मोबाईलवर आलेला ओटीपी मिळवून अथवा पेटीएम, फोन-पे सारख्या मोबाईल वॉलेट कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून त्यांना कॅशबॅक देण्याचे आमिष दाखवून, क्युआर कोड स्कॅन करण्यास सांगून तसेच युपीआय पिनची मागणी करुन फसवणुकीचे प्रकार केले जात आहेत. त्याचप्रमाणे शॉपिंग, विवाह, खाद्यपदार्थ यांची माहिती देणाऱ्या संकेतस्थळावर बनावट कस्टमर केअर क्रमांक टाकून त्याद्वारे देखील फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत.

त्याशिवाय लग्न जुळविणाऱ्या साईटस्‌ वरुन अथवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऑनलाईन मैत्री करुन आधी प्रेमाचे जाळे आणि नंतर महागड्या गिपटच्या मोहात पाडून विशेषतः एकाकी, घटस्फोटीत महिलांना प्रामुख्याने लक्ष्य करुन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तर काही प्रकारात सायबर गुन्हेगार व्हॉटस्‌ॲप वरुन एनी डेस्क, क्वीक सपोर्ट, टीम व्हीवर अशा प्रकारच्या ॲपची लिंक पाठवून ते डाऊनलोड करण्यास सांगून समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलवर पूर्णपणे ताबा मिळवून त्यांच्या बँक खात्यातील सर्व रक्कम काढून घेत असल्याचे देखील आढळून आले आहे. दिवसेंदिवस सदर सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये लुबाडत आहेत.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत या वर्षात गत ९ महिन्यामध्ये अशा प्रकारचे २२५ गुन्हे घडल्याची नोंद आहे. यात सोशल मिडीयाशी संबंधित असलेल्या फेसबुक, ट्‌वीटर, व्हॉटस्‌ॲप, युट्युब, इन्स्टाग्राम आणि इतर असे ३७ गुन्हे घडल्याची नोंद आहे. तसेच एनी डेस्क, क्वीक सपोर्ट, टीम व्हीवरच्या माध्यमातून फसवणूक १५, इन्शुरन्स पॉलिसी ३, सेक्सटॉर्शन १, बँक फ्रॉड३४, क्रिप्टो ट्रेडींग ११, क्रेडीट कार्ड ७, जॉब टास्क३५, तोतयागिरी १५, आर्मी अकाऊंट २, लोन ॲप १५, लाईट बिल ८ आणि इतर ४५ अशा एकूण २२५ गुन्ह्यांचा समावेश आहे. आतापर्यंत पोलिसांनी यातील फक्त ४२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये सायबर गुन्हेगारांनी कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.

सध्याच्या काळात बहुतांश आर्थिक व्यवहार ऑनलाईन होत आहेत. मात्र, बहुतेक लोकांना ऑनलाईन आर्थिक व्यवहार कसे केले जातात, याची माहिती नसल्याने सायबर गुन्हेगार याचाच गैरफायदा घेत असल्याचे सध्या घडत असलेल्या विविध सायबर गुन्ह्यांवरुन दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरताना दक्षता घेऊन तसेच ऑनलाईन ॲप्लिकेशन्स वापराचे पूर्णपणे ज्ञान आत्मसात करुनच ऑनलाईन बँकींग, फेसबुक, इन्स्टाग्राम यासह इतर ऑनलाईन ॲप्लिकेशन्सचा वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलिसांचा सायबर सुरक्षासंबंधी जनजागृतीवर भर...
सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असला, तरी त्यांना पकडण्यात पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एखाद्या आरोपीला पकडल्यानंतर तो जामीन मिळवून काही दिवसात बाहेर येतो. त्यानंतर तो पुन्हा याच कामात लागतो. त्यामुळे सायबर गुन्हे घडू नयेत यासाठी नागरिकांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सायबर गुह्यांसंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘सायबर सुरक्षा जागरुकता अभियान'ला सुरुवात केली आहे. या ‘अभियान'ची सुरुवात ६ ऑवटोबर रोजी वाशीतून करण्यात आली आहे.  
दोन वर्षातील सायबर गुन्ह्यांचा तुलनात्मक तक्ताः
                          २०२२                    सप्टेंबर २०२३ पर्यंत
इन्शुरन्स पॉलिसी         १२                         १५
सेक्सटॉर्शन                   ७                          ३
बँक फ्रॉड                     ५१                         ३४
क्रिपटो ट्रेडींग               १७                         ११
क्रेडीट कार्ड                   ९                           ७
जॉब टास्क                  २७                         ३५
तोतयागिरी                  ८                          १५
आर्मी अकाऊंट              ५                           २
लोन ॲप                     ९                           १५
लाईट बिल                  १२                           ८
ऍनी डेक्स-                  १२                          १५
 इतर                         १०                           ४२  
एकूण                       २०७                        २२५ 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या ८ घर मालकांविरुध्द गुन्हे