अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण

मानधन मिळाले तरच कोर्टात येईन!
सरकारी वकील घरत आपल्या भूमिकेवर ठाम

नवी मुंबई  ः सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला लढवणारे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचे १५ लाख रुपयांचे मानधन पोलिसांनी थकवले आहे. त्यामुळे ते गेल्या तीन तारखांना पनवेल सत्र न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. परिणामी, या खटल्याचे कामकाज ठप्प झाल्याने त्याचा फायदा घेण्यास आरोपींनी सुरुवात केली आहे. या खटल्यातील क्रमांक दोनचा आरोपी राजू पाटील याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दिला आहे. त्यावर येत्या १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत कोर्टाची पायरीही चढणार नाही, अशी भूमिका ॲड. घरत यांनी घेतली आहे. त्यामुळे अश्विनी बिद्रे यांच्या नातेवाईकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नवी मुंबई पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची आरोपी अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजीच्या रात्री मीरारोड मध्ये हत्या केली. कुरुंदकर नंतर या हत्याकांडात सहभागी असलेले राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या आरोपींना पोलिसांनी अटक केली. सदर सर्व आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. या खटल्याची सुनावणी सध्या पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात सुरु आहे. या खटल्यात न्यायालयाने आतापर्यंत सुमारे ८० साक्षीदार तपासले आहेत. या खटल्यातील शेवटच्या साक्षीदार सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांची साक्ष सुरु आहे. खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आलेले असताना नवी मुंबई पोलिसांनी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचे १५ लाख रुपयांचे मानधन दिलेले नाही. मानधन मिळाले नाही तर आपण खटला सोडणार, असा इशारा घरत यांनी पोलिसांना वारंवार दिला होता. मात्र, नवी मुंबई पोलीसांनी तो गांभीर्याने घेतला नाही.


अखेर मानधन न मिळाल्यामुळे ॲड प्रदीप घरत यांनी या खटल्याच्या कामकाजासाठी न्यायालयात येणे बंद केले आहे. त्यामुळे गेल्या तीन तारखांपासून या खटल्याचे कामकाज ठप्प झाले आहे. त्याचाच फायदा घेऊन आरोपी राजू पाटील याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर येत्या १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीला जर प्रदीप घरत उपस्थित राहिले नाही तर त्याचा फायदा आरोपींना होणार आहे.  


पोलिसांचा अनुभव समाधानकारक नाही...
या खटल्यात नवी मुंबई पोलिसांचा मला जो अनुभव आला तो असमाधानकारक आहे. मी खटला सोडण्याचा इशारा दिल्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला नाही. जोपर्यंत मला माझे मानधन मिळत नाही तोपर्यंत मी खटल्याचे कामकाज चालवणार नाही. खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी पोलिसांनी पर्यायी व्यवस्था करावी, असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नवी मुंबई पोलिसांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे.


न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार...
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर याला वाचवण्याची एकही संधी नवी मुंबई पोलिसांनी सोडलेली नाही. त्यामुळे आम्हाला यापूर्वीही मोठा संघर्ष करावा लागला आहे. आताही पोलीस आरोपींना जामीन मिळावा यासाठी सरकारी वकिलांचे मानधन लटकवत आहेत. जर आरोपींना जामीन मिळाला तर राज्याचे गृहमंत्री, नवी मुंबई पोलीस आयुक्त, गृह सचिव यांच्या विरोधात मुुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी दिला आहे. 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई शहरातील पोलीस बिट चौक्या धूळखात?