अंमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांची पुन्हा धडक कारवाई  

१६ परदेशी नागरिकांची धरपकड; ८५ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

नवी मुंबई : अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांचे रॅकेट उध्वस्त करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांनी ६ ऑवटोबर रोजी सायंकाळी पुन्हा एकदा वेगवेगळ्या ठिकाणी नियोजनबध्द धाडी टाकून १६ परदेशी नागरिकांची धरपकड केली. या धडक कारवाईत १ परदेशी नागरिक अंमली पदार्थासह सापडला असून त्याच्याकडून सुमारे ८५ लाख रुपये किंमतीचे एमडी आणि कोकेन जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पासपोर्ट आणि व्हिजा शिवाय बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या १४ परदेशी नागरिकांची देखील पोलिसांनी धरपकड केली आहे. दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी गत महिन्यात देखील अंमली पदार्थाच्या तस्करांविरोधात अशाच प्रकारची धडक कारवाई करुन १४ परदेशी नागरिकांना पकडून त्यांच्याकडून सुमारे ५ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहे.

नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाईला केली आहे. गत महिन्यात सुध्दा नवी मुंबई पोलिसांकडून अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. ६ ऑवटोबर रोजी सायंकाळी देखील नवी मुंबई पोलिसांनी उलवे नोड मधील सेक्टर-३, ५, १८, २४ आणि २५ या भागात संयुक्तरित्या एकाचवेळी १२ ठिकाणी धाड टाकून १६ परदेशी नागरिकांची धरपकड केली. यातील एका आफ्रिकन (नायजेरीयन) जुलीअस ओ एन्थोनी (४४) याच्याकडून ७० लाख ६० हजार रुपये किंमतीचे ७०६ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) आणि १४ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ९५ ग्रॅम कोकेन असे एकूण ८४ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे.  

तसेच या आरोपींकडून अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी वापरण्यात येणारा डिजीटल वजन काटा, मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये पासपोर्ट आणि व्हिजा शिवाय अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या ७ महिला आणि ७ पुरुष आफ्रिकन नागरिकांची धरपकड करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय पासपोर्ट ॲक्ट नुसार कारवाई करुन त्यांच्या विरोधात पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

सदर कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड, टेळे, विशाल मेहुल, मिलिंद वाघमारे यांच्यासह परिमंडळ-१ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक निरज चौधरी सहभागी झाले होते. या विशेष मोहिमेवर पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, उपायुक्त पंकज डहाणे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे देखरेख करत होते. तर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे स्वतः या मोहिमेवर लक्ष देऊन होते.  

या कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांनी मागील महिन्याभरापासून नवी मुंबईत विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांवर वॉच ठेवून त्यांची गोपनीय माहिती काढली होती. त्यानंतर ६ ऑवटोबर रोजी सायंकाळी एकाचवेळी उलवे येथील १२ बिल्डींग मधील २४ पलॅटवर धाड टाकून त्यात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची तपासणी करत त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत ३ सहाय्यक पोलीस आयुक्त, १५ पोलीस निरीक्षक तसेच ३५० महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सदर मोहिमेची माहिती लिक होऊ नये यासाठी कारवाईसाठी जाणाऱ्या पोलिसांना देखील ऐनवेळी माहिती देऊन या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण