मोरबे जल पूजन प्रकरण :

राजकारण्यांच्या हट्टापायी अभियंता, सुरक्षा रक्षक गोत्यात  

नवी मुंबई : मोरबे धरणातील जल पूजनाची नवी मुंबईतील भाजपच्या पदाधिकाऱयांच्या स्टंटबाजीचा फटका मोरबे धरणावर कार्यरत असलेल्या महापालिका अभियंत्यांना व सुरक्षा रक्षकांना बसला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेच्या तीन अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचप्रमाणे महापालिका प्रशासनाने मोरबे धरणाची सुरक्षा व्यवस्था पाहणारे तीन सुरक्षा रक्षक व सुपरवाझर यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाईला सुरुवात केली आहे. 

मोरबे धरणाच्या निषिध्द क्षेत्रात विनापरवानगी जबरदस्तीने घुसून जल पूजन करणारे नवी मुंबईतील माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, सुधाकर सोनावणे व अन्य भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार महापालिकेच्या अभियंता विभागाने खालापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. तसेच नवी मुंबई जिल्हा काँग्रेसने देखील भाजपाच्या या स्टंटबाजीचा निषेध करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती.  

अखेर नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेच्या तीन अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंता (मोरबे धरण) सुभाष सोनावणे, उपअभियंता वसंत पडघन व कनिष्ठ अभियंता अशोक मोरे यांचा समावेश आहे. तर मोरबे धरणाची सुरक्षा व्यवस्था पाहणारे तीन सुरक्षा रक्षक व सुपरवाझर यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने प्रशासकीय कारवाई सुरु केली असून त्यांच्या डोक्यावर निलंबनाची टांगती तलवार लटकत आहे.  

दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करणे, भादवि कलम ४४१ आणि ४९७ अन्वये नियमांचे उल्लंघन करणारी आहे. तसेच धरण प्रतिबंध कायद्याचेही उल्लंघन या लोकप्रतिनिधींनी केले आहे. त्यामुळे वरील सर्वांवर गुन्हे नोंद करण्यात यावे अशी तक्रार खालापूर पोलिस ठाण्यात देताना सोबत पुरावा म्हणून छायाचित्रे आणि व्हिडिओ चित्रण देत असल्याचे महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मोरबे धरणाच्या निषिद्ध क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून जलपुजन करणाऱयांवर लवकरच गुन्हा नोंद केला जाणार असल्याची माहिती खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाला कुंभार यांनी दिली. त्यामुळे माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, यांच्यासह अन्य माजी महापौर आणि माजी नगरसेवक, नगरसेविका यांच्यावर निषिध्द क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

स्वच्छता मोहिमेत नवी मुंबई पोलिसांचा उत्स्फुर्त सहभाग