अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण

मानधन मिळाल्याशिवाय कोर्टाची पायरी न चढण्याचा विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचा निर्धार

नवी मुुंबई :  सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यातील विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचे सुमारे १५ लाख रुपयांचे मानधन गृह विभागाकडे थकले आहे. हा खटला अंतिम टप्प्यात आलेला असताना हे मानधन देण्यासाठी गृह विभागाने कोणतीही तत्परता दाखवलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत पनवेल सत्र न्यायालयाची पायरीही चढणार नाही, असा निर्धार प्रदीप घरत यांनी केला आहे. त्यानुसार प्रदीप घरत यांनी लागोपाठ दोन तारखांच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे टाळले आहे. त्यामुळे खटल्याचे कामकाज लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने अश्विनी बिद्रे यांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी यांची हत्या केली. याप्रकरणी कुरुंदकरसह राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या आरोपींना अटक झाल्यानंतर या खटल्याची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुरू झाली. न्यायालयाने या खटल्यात आतापर्यंत सुमारे ८० साक्षीदार तपासले आहेत. हा खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांची साक्ष सुरू आहे. त्यांची सरतपासणी अद्याप पूर्ण झालेली नाही. ही सरतपासणी आणखी दोन तारखांपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरोपीचे वकील विशाल भानुशाली हे त्यांची उलटतपासणी घेणार आहेत. मात्र मानधन थकल्यामुळे विशेष सरकारी वकील यांनी न्यायालयात येणे थांबवले आहे. त्यामुळे दोन तारखांपासून या खटल्याची सुनावणी ठप्प झाली आहे.

दरम्यान, अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी सुरुवातीपासून आरोपींना पाठीशी घालण्यासाठी जिवाचा आटापिटा केला आहे. आरोपींवर कारवाईसाठी प्रत्येक वेळी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागला. आताही विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचे मानधन मुद्दामहून थकवले जात आहे. घरत यांनी हा खटला आता सोडला तर त्याचा फायदा आरोपींना होणार आहे. त्यामुळे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचे मानधन तातडीने देण्यात यावे. अशी मागणी अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. मात्र या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाने कोणतीही दखल घेतलेली नाही.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 फरार आरोपी ३० वर्षांनंतर गजाआड