ऐरोली येथे लोकलवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या दगडफेकीत तरुण जखमी  

ऐरोली ते ठाणे रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या लोकलवर दगडफेक केल्याने तरुण जखमी

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील ऐरोली ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान अज्ञात व्यक्तीने धावत्या लोकलवर दगडफेक केल्याने लोकलमधुन प्रवास करणारा एक तरुण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या दगडफेकीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव शंकर चव्हाण (18) असे असून त्याचा डोळा थोडक्यात बचावला  आहे. वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयाने त्याच्यावर उपचार करुन त्याला घरी सोडले आहे.  

या घटनेतील जखमी शंकर चव्हाण हा तरुण ऐरोली सेक्टर-2 मध्ये राहण्यास असून  गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या दोन मित्रांसह लोकलने ठाणे येथे खरेदीसाठी जात होता. यावेळी तिघे मित्र लोकलच्या दरवाजात उभे राहुन प्रवास करत असताना ऐरोली दिघा रेल्वे स्टेशन दरम्यान अज्ञात व्यक्तीने या लोकलवर दगड भिरकावला. सदरचा दगड लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या शंकर चव्हाण याच्या डोळ्याला लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर शंकर व त्याच्या मित्रांनी ठाणे रेल्वे स्थानकातून पुन्हा ऐरोली येथे येऊन राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रथमोपचार घेतले. त्यानंतर शंकर सांयकाळी पुढील उपचारासाठी वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात गेला होता. तेथील डॉक्टरांनी शंकरवर उपचार करुन त्याला घरी पाठवून दिले.  या घटनेची अद्याप रेल्वे पोलिसांना माहिती न मिळाल्याने याबाबत ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.    

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण