वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने ई-चलानद्वारे दंड

 खारघर मध्ये ४७ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

नवी मुंबई : खारघर शहरामध्ये अनेक वाहन चालक बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याने खारघर वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहन चालकांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार ९ सप्टेंबर रोजी खारघर वाहतूक पोलिसांनी खारघरच्या वेगवेगळ्या भागातील अशा ४७ बेशिस्त वाहन चालकांवर ई-चलानद्वारे कारवाई केली आहे.

खारघर शहरामध्ये अनेक वाहन चालक बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने लावत असल्याने खारघरमध्ये वाहतूक कोंडीचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्याचा विनाकारण इतर नागरिकांना त्रास होत असल्याचे आढळून आल्याने खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे यांच्या सुचनेनुसार खारघर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी खारघर वाहतूक पोलिसांनी खारघर, सेक्टर-२० मधील जलवायु विहार येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने रस्त्यावर लावलेल्या एकूण ८ चारचाकी वाहनांवर १२२ प्रमाणे ई-चलानद्वारे कारवाई केली.

त्याचप्रमाणे सायंकाळी वाहतूक पोलिसांनी बेलपाडा येथील गॅरेज लाईन परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १५ वाहनांवर ई-चलनद्वारे कारवाई केली. तसेच खारघर, सेक्टर-१५ खारघर मधील डी-मार्ट येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा एकूण २४ वाहनांवर ई-चलानद्वारे कारवाई केली आहे. सदरची कारवाई महिला पोलीस नाईक ए. ए. तुरे, पोलीस कॉन्स्टेबल एन. डी. पाबळे आणि अंमलदारांनी केली.

नागरिकांनी वाहतुकीस अडथळा होईल अशा पध्दतीने रस्त्यावर वाहने लावू नयेत. अन्यथा त्यांच्यावर ई-चलान द्वारे कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. खारघर मध्ये अशी कारवाई यापुढे देखील चालू राहणार आहे. -संतोष काणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर वाहतूक शाखा. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाशी सेक्टर-8 मध्ये 15 लाखांची घरफोडी