इन्शुरन्स पॉलीसीमध्ये बोनस देण्याचे आमिष

फसवणुक करणा-या टोळीचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश  

नवी मुंबई : इन्शुरन्स पॉलिसी बंद करुन त्याबदल्यात ५८ लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवुन कामोठे येथे राहणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल २ कोटी २४ लाख रुपये उकळणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी हरियाणा आणि दिल्ली येथून अटक केली आहे. या टोळीने देशभरात अशाच पध्दतीने केलेले फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

सायबर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीमध्ये प्रशांत चमोली (३५), परवेज मो. शरीफ (४१) आणि रणजीत ब्यास तिवारी (३२) या त्रिकूटाचा समावेश आहे. प्रशांत चमोली आणि त्याची टोळी  इन्शुरन्स पॉलिसी घेणाऱ्या ग्राहकांच्या सुविधेसाठी असलेल्या आयजीएमएसच्या वेबसाईटवर इन्शुरन्स पॉलिसी धारकाची माहिती मिळवत होती. त्यानंतर ते पॉलिसी धारकाला संपर्क साधून पॉलिसीमध्ये अधिकचे बोनस देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत होते. अशाच पध्दतीने प्रशांत चमोली आणि त्याच्या टोळीने कामोठेतील व्यक्तीला आयजीएमएसचा प्रतिनिधी दिपक बन्सल असल्याचे भासवून त्याच्याकडून तब्बल २ कोटी २४ लाख रुपये उकळले होते.  

ऑगस्ट महिन्यात याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर क्लिष्ट आणि आव्हानात्मक असलेला सदर गुन्हा सायबर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उपनिरीक्षक बंडगर आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला असता, फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी १ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम प्रशांत चमोली याच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात गेल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सायबर पोलिसांनी सदर बँक खात्यावरुन प्रशांत चमोली याची माहिती काढली असता, तो हरियाणा येथील गुरुग्राम भागात राहत असल्याचे समजले. त्यानंतर सायबर पोलिसांनी हरियाणातील गुरुग्राम भागात सापळा रचून आरोपी प्रशांत चमोली याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून ५ मोबाईल फोन, ५ सिमकार्ड, १ व्हिसा कार्ड आणि पासपोर्ट जप्त करण्यात आले.

अधिक चौकशीत प्रशांत चमोली याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला बँक खाते पुरविणारा आणि सिमकार्ड पुरविणारा परवेज मो. शरीफ आणि मनी ट्रान्सफर काम करणारा रणजीत ब्यास तिवारी या दोघांना सायबर पोलिसांनी नवी दिल्लीतील वेगवेगळ्या भागातून अटक केली. या टोळीने ज्या-ज्या बँक खात्यात पैसे वळते केले, ती सर्व बँक खाती सिल सायबर पोलिसांनी सील करण्यात आली आहेत. या टोळीने अशाच पध्दतीने फसवणूक केलेला मुंबईतील विलेपार्ले येथील सायबर फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आला आहे. या टोळीकडून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू येथील व्यवहाराची माहिती मिळाली असून सदर गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान, सदर टोळीने अशाच पध्दतीने अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता असून त्यानुसार त्यांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती ‘सायबर पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली.    

या गुन्ह्याच्या तांत्रिक तपासाची विशेष कामगिरी महिला पोलीस पुनम गडगे यांनी केली असून त्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पहिल्या सायबर गुन्हे विश्लेषण करणाऱ्या महिला पोलीस ठरल्या आहेत.  

सायबर फसवणूक करणारे आरोपी गर्दुल्ले...
सदर फसवणूक प्रकरणातील आरोपी कुणीतरी उच्च शिक्षित आरोपींनी केला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सायबर पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर ते गर्दुल्ले आणि नशेबाज असल्याचे आढळून आले आहे. तसे त्यांनी कामोठे येथे राहणाऱ्या व्यक्तीकडून २०२० पासून ते आत्तापर्यंत तब्बल २ कोटी २४ लाख रुपये उकळले असून इतक्या मोठ्या प्रमाणात लुटलेली रक्कम त्यांनी जुगार, नशाबाजी आणि बारमध्ये उडवल्याचे तपासात आढळून आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरी गावातील नायजेरियन पोलिसांच्या प्रतिक्षेत?