गोव्याहून मुंबईत नेला जाणारा 64 लाख रुपये किंमतीचा अवैध मद्याचा साठा जप्त 

महाराष्ट्रात बंदी असलेल्या विविध ब्रँडच्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा सुमारे 64 लाख रुपये किंमतीचे 918 बॉक्स जप्त

नवी मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे येथील पथकाने सोमवारी सायंकाळी तुर्भे रेल्वे स्थानकासमोर सापळा लावून गोवा येथून मुंबईच्या दिशेने नेला जाणारा सुमारे 64 लाख रुपये किंमतीचा अवैध मद्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीघांना अटक केली आहे. हा मद्याचा साठा कोणी मागविला होता. तो मुंबईत कोणत्या ठिकाणी नेण्यात येत होता, याबाबतचा पुढील तपास उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे.  

महाराष्ट्रात बंदी असलेल्या विविध ब्रँडच्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा काही व्यक्ती ट्रकमधुन घेऊन जाणार असल्याची माहिती ठाणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे दुय्यम निरीक्षक व त्यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ठाणे बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ सापळा लावला होता. सायंकाळच्या सुमारास संशयीत बारा चाकी ट्रक तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदर ट्रक अडवून त्याची तपासणी केली असता, सदर ट्रकमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या विविध ब्रँडच्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा सुमारे 64 लाख रुपये किंमतीचे 918 बॉक्स आढळुन आले.  

त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ट्रकसह मद्याचा साठा असा सुमारे 78 लाख 8 हजार रुपये किंमतीचा ऐवज जफ्त करुन ट्रक चालक तेरसिंग धनसिंग कनोजे (32), नासीर अन्वर शेख (45) आणि गुड्डू देवसिंग रावत (45) या तिघांना अटक केली आहे. सदर मद्याचा साठा गोव्यातून मुंबईच्या दिशेने नेण्यात येत असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या त्रिकुटानी दिली आहे. हा मद्याचा साठा कोणी मागविला होता. तो मुंबईत कोणत्या ठिकाणी नेण्यात येत होता, याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी दिली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

इन्शुरन्स पॉलीसीमध्ये बोनस देण्याचे आमिष