एनएमएमटी बस चालकावर तलवार उगारणारा कार चालक पोलिसांच्या ताब्यात

  तलवार घेऊन बस चालकाला धमकावणारा कार चालकावर आर्म ऍक्टखाली गुन्हा दाखल 

नवी मुंबई  : एनएनएमटी बस चालकाने ब्रेक मारल्याने पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार एनएमएमटी बसवर धडकुन कारचे नुकसान झाल्याने संतफ्त कार चालकाने आपल्या जवळ असलेली तलवार काढुन एनएमएमटी बस चालकावर उगारल्याचा प्रकार सोमवारी वाशीत घडला. सनी लांबा (40) असे या कार चालकाचे नाव असून वाशी पोलिसांनी त्याच्यावर आर्म ऍक्टखाली गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. सनी लांबा याने भररस्त्यात गर्दीच्या वेळी केलेल्या या प्रकाराचे व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.  

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेतील चालक सुर्यकांत सुर्यवंशी (29) हा चालक सोमवारी रात्री एनएनएमटीची उरण-कोपरखैरणे या मार्गावरील 31 क्रंमांकाची बस घेऊन उरण येथून कोपरखैरणे येथे जात होता. रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सामरास चालक सुर्यवंशी हा वाशी सेक्टर-10 मधून बस घेऊन जात असताना, बसच्या पुढुन अचानक काही पादचारी रस्ता ओलांडून गेल्याने चालक सुर्यवंशी याने बसला ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागुन भरधाव वेगाने येणारी सिल्वर रंगाची मारुती सुझुकी रीट्स कार एनएमएमटी बसवर धडकली. या अपघातात रीट्स कारचे नुकसान झाल्याने संतफ्त झालेल्या कार चालक सनी लांबा याने आपल्या कारमध्ये असलेली तलवार काढली.

 त्यानंतर त्याने बस चालक सुर्यवंशी याला शिवीगाळ करत ड्रायव्हर साईडच्या दरवाजावर तलवार मारुन बस चालक सुर्यवंशी याला धमकावले. वाशी सेक्टर-10 मध्ये भररस्त्यात हा प्रकार बराचवेळ सुरु होता. त्यामुळे बसमधील तसेच बाहेरील काही हौशी व्यक्तींनी तलवार घेऊन बस चालकाला धमकाव-या सनी लांबा याचे आपल्या मोबाईलवरुन चित्रीकरण केले. तसेच सदर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले. वाशी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सनी लांबा याला ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत त्याच्या विरोधात आरम ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सनी लांबा याला नोटीस बजावून सोडून दिले. सध्या सनी लांबा याचा एनएमएमटी बस चालकाला धमकावतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.  

दरम्यान, सनी लांबा हा कळंबोली येथे राहण्यास असून तो सोमवारी रात्री आपल्या पत्नी व मुलांसह एका कार्यक्रमासाठी जात होता. रस्त्यात हा प्रकार घडल्यानंतर संतफ्त झालेल्या सनी लांबा याने त्याच्याजवळ लग्नात वापरण्यात येणारी तलवार घेऊन बस चालकाला धमकावल्याचे पोलिसांनी सांगितले.   

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

गोव्याहून मुंबईत नेला जाणारा 64 लाख रुपये किंमतीचा अवैध मद्याचा साठा जप्त