एकाचवेळी ६ ठिकाणी धाड; ७५ परदेशी नागरिक ताब्यात  

 अंमली पदार्थ तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई

नवी मुंबई : शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईत येणाऱ्या आफ्रिकन देशातील विशेषतः नायजेरीयन, केनियन, युगांडा तसेच बांग्लादेशी नागरिकांचे पासपोर्ट आणि व्हिसा बनावट असल्याचे तसेच त्यांच्या पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील ते भाड्याने घर-पलॅट घेऊन नवी मुंबईत बेकायदेशीररित्या वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यातील अनेक परदेशी नागरिक गुन्हेगारी कारवाया करत असल्याचेही आढळून आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी अशा परदेशी नागरिकांविरोधातील कारवाई तीव्र करुन त्यांची धरपकड सुरु केली आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी दुपारी एकाचवेळी सहा वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून ७५ परदेशी नागरिकांची धरपकड करुन त्यांची चौकशी सुरु केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.  

नवी मुंबईत बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेले परदेशी नागरिक विशेषतः नायजेरीयन, केनियन, युगांडा या देशातील नागरिक अंमली पदार्थांच्या तस्करीत तसेच गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतल्याचे आढळून आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या अनेक परदेशी नागरिकांची धरपकड करुन त्यांच्याकडून कोट्यावधी रुपयांचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. परदेशी नागरिकांकडून सुरु असलेली अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचे सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याच्या उद्देशाने ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी बेकायदेशीररित्या वास्तव्यास राहून अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.  

त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने १ सप्टेंबर रोजी दुपारी आयुक्तालयाच्या हद्दीत वाशी, कोपरखैरणे, खारघर आणि तळोजा या चार भागातील सहा ठिकाणी विदेशी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या घरावर धाडी टाकल्या. या कारवाईत पोलिसांनी ७५ पेक्षा अधिक परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्या घरांची आणि कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी अनेक परदेशी नागरिकांजवळ वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ आढळून आले. तसेच अनेक परदेशी नागरिकांजवळ पासपोर्ट आणि व्हिजा नसल्याचे तसेच त्यांची मुदत संपल्याचेही आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या सर्वांची धरपकड करुन त्यांच्यावर पुढील कार्यवाही सुरु केली आहे.  

नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यात ७०० ग्रॅम कोकेन, ३०० ग्रॅमपेक्षा जास्त एमडी, ३०० किलो ट्रामाडॉल हायड्रोक्लोराइड या अंमली पदार्थाचा समावेश आहे. सदर कारवाईत गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे असे एकूण ६०० हुन अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश होता. या कारवाई दरम्यान एखाद्या परदेशी नागरिकाने पोलिसांसोबत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्यास अथवा इतर कुठले कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास, अशा परदेशी नागरिकांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या पथकासह ॲम्ब्युलन्स देखील मदतीसाठी सोबत घेतली होती. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एनएमएमटी बस चालकावर तलवार उगारणारा कार चालक पोलिसांच्या ताब्यात