वाधवान बंधुंना व्हिआयपी ट्रीटमेंट देणे पडले महाग

कैदी पार्टीतील पोलीस उपनिरीक्षकासह ६ अंमलदार निलंबित  

नवी मुंबई : तब्बल ३० हजार कोटींहुन अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या वाधवान बंधुंना तळोजा कारागृहातून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेताना व्हिआयपी ट्रीटमेंट देणे कैदी पार्टीवरील पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. वाधवान बंधुंनी कैदी पार्टीसमोर रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये आपल्या कुटंबियासोबत कारमध्ये बसून व्यावसायिक विषयांवर चर्चा केल्याचे आढळून आले आहे. त्याशिवाय त्यांनी मोबाईल फोन आणि लॅपटॉपचा वापर करणे, कागदपत्रांवर सह्या करणे, नातेवाईकांसोबत जेवण करणे, कॉफी पिणे असे प्रकार केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वाधवान बंधुंच्या कैदी पार्टीवर तैनात असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकासह सात जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि.चे प्रवर्तक असलेले आणि बँक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले कपिल आणि धीरज वाधवान दोघेही सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त आहेत. तळोजा जेलमध्ये कैदेत असलेल्या इतर कैद्यांना जी सवलत मिळत नाही, ती सवलत आणि व्हिआयपी ट्रीटमेंट वाधवान बंधुंना मिळत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ७ ऑगस्ट रोजी कपिल वाधवन यांना तळोजा कारागृहातून मुंबईतील केईएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांची आणि सहकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने खाजगी कार मध्ये बसून मोबाईल, लॅपटॉप हाताळल्याचे आणि कारमध्येच नातेवाईकांसह जेवण केल्याचे आढळून आले आहे.  

त्यानंतर दोन दिवसांनंतर धीरज वाधवान याला देखील त्याच पध्दतीने तळोजा जेलमधून मुंबईतील जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याने सुध्दा त्याच पध्दतीने कैदी पार्टीसमोर रुग्णालयाच्या पार्कींगमध्ये नातेवाईकांची भेट घेऊन कागदपत्रे हाताळल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे वाधवान बंधुंच्या नातेवाईकांकडून कैदी पार्टीतील पोलिसांना स्नॅक्स सुध्दा खाण्यासाठी देण्यात आल्याचे आढळून आले आहे. पोलिसांकडून कैद्यांना अशा पध्दतीने व्हिआयपी ट्रीटमेंट देता येत नसताना, देखील कैदी पार्टीवरील पोलिसांनी वाधवान बंधुंना व्हिआयपी ट्रिटमेंट दिल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. त्यानंतर पोलीस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील यांनी वाधवान बंधुंच्या कैदी पार्टीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक आशुतोष देशमुख, पोलीस हवालदार विशाल दखने, सागर देशमुख, प्राजक्त पाटील, रविंद्र देवरे, प्रदीप लोखंडे आणि माया बारवे या सर्वांवर निलंबनाची कारवाई केली आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एकाचवेळी ६ ठिकाणी धाड; ७५ परदेशी नागरिक ताब्यात