उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाची कारवाई  

नवीन पनवेलमधून पावणे दोन कोटींच्या भांगेच्या गोळ्या जप्त    

नवी मुंबई : उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाने मंगळवारी नवीन पनवेल येथील दुकानावर तसेच भिवंडी येथील कंपनीवर छापा मारुन विविध ब्रँडच्या छोटया मोठया प्लॅस्टिक पाऊचमधून भांग मिश्रीत पदार्थाची साठवणूक आणि विक्री करणा-या दोघांवर कारवाई केली आहे. राज्य भरारी पथकाने या कारवाईत 1 कोटी 74 लाखांचा मुद्देमाल जप्त करुन चार वाहने देखील जप्त केली आहेत.  

नवीन पनवेल सेक्टर-13 मधील सिडको कॉलनीतील नीलम जनरल स्टोअर्समध्ये भांग मिश्रीत पदार्थांची साठवणूक करुन त्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने मंगळवारी नीलम जनरल स्टोअर्स वर छापा टाकला होता. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी केली असता, सदर दुकानात तब्बल 1340 कि. ग्रॅम भांग मिश्रीत पदार्थ आढळुन आले. भरारी पथकाने सदर माल जप्त करुन आरोपी विशाल चौरासिया याला ताब्यात घेतले. त्यानंतर भरारी पथकाने चौरसिया याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे भिवंडी मानकोली येथील मे. सेफ ट्रान्सपोर्ट कंपनीत छापा टाकला.  

यावेळी सदर कंपनीच्या गोडावूनमध्ये तब्बल 7 हजार 139.48 कि.ग्रॅ. भांग मिश्रीत विविध ब्रॅडचे छोटे, मोठे प्लॅस्टिक पाऊच आढळून आले. त्यानंतर राज्य भरारी पथकाने या मालाच्या वाहतूकीसाठी वापरलेली चार वाहने असा एकुण 1 कोटी 74 लाखांचा मुद्देमाला भरारी पथकाने जप्त केला आहे. या कारवाईत भरारी पथकाने मे. सेफ ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापकीय धमेंद्र शर्मा आणि नीलम जनरल स्टोअर्सचा मालक विशाल चौरासिया या दोघांना अटक केली आहे. सदरची कारवाई निरीक्षक व्ही.के.थोरात, निरीक्षक आर.एम.खान, दुय्यम निबंधक पी.जी.दाते, दुय्यम निरीक्षक योगेश पाडवे, जवान बी.ए.बोडरे, एस.व्ही. शिवापूरकर, ए.जाधव. पी.धवने, एस.राठोड, नंद महाजन, कीर्ती कुंभार आदींनी केली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाधवान बंधुंना व्हिआयपी ट्रीटमेंट देणे पडले महाग