महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरण :
ऑडिओ, व्हिडीओ टेपमधील आवाज अभय कुरुंदकरचाच
नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांनी हत्या होण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ आणि व्हिडीओ टेपमधील आवाज हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याचाच आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अश्विनी यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला तेव्हा या सर्व ऑडिओ आणि व्हिडीओ टेप सदर गुन्ह्याच्या तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी हस्तगत केल्या होत्या. त्यांच्याच उपस्थितीत या सर्व पुराव्यांचे पंचनामे झाले होते. न्यायालयात या पुराव्यांवर शिक्कामोर्तब झाल्याने आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांची साक्ष सध्या पनवेल सत्र न्यायालयात सुरु आहे.
बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी रात्री मीरा रोडमधील पलॅटमध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या केली होती. त्यानंतर लाकडे कापण्याच्या कटरने बिद्रे यांच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करुन ते गोणींमध्ये भरले होते. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकून दिले होते. सुरुवातीला या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी संगीता अल्फान्सो या तपास अधिकारी होत्या. या तपासादरम्यान त्यांनी हस्तगत केलेल्या पुराव्यांबाबत त्यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात साक्ष सुरु आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी त्यांची सरतपासणी घ्ोतली. सदर सरतपासणी आणखी एक दिवस चालणार असून त्यानंतर आरोपींचे वकील विशाल भानुशाली अल्फान्सो यांची उलटतपासणी घेणार आहेत.
सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या ऑडिओ आणि व्हिडीओ टेपमधील आवाज अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांचाच आहे, तेे कुरुंदकरसोबत काम करणारे कर्मचारी कर्डिले आणि अश्विनी यांच्यासोबत काम करणाऱ्या पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांनी ओळखले होते. सदरचा पंचनामा अल्फान्सो यांच्या उपस्थितीत झाला होता. न्यायालयासमोर या पुराव्याची शहनिशा करण्यात आली. यावेळी न्यायालयात आरोपी कुरुंदकर, राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर हजर होते.
१६ ऑडिओ टेप, ४ व्हिडीओ...
संगीता अल्फान्सो यांनी अश्विनी यांच्या लॅपटॉपमधून १६ ऑडिओ टेप आणि ४ व्हिडीओ, संगणक तज्ञांच्या मदतीने डाऊनलोड केले होते. ते पंचांसमोर सीलबंद करण्यात आले होते. अश्विनी यांची हत्या केल्यानंतर कुरुंदकर मध्यरात्री फाऊंटन ते ससूनवघरच्या रस्त्यावर येरझारा मारत होता. त्याचा नकाशा काढून त्याची प्रिंटआऊट काढली होती. सदर प्रिंटआऊटही न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहे.
१५ लाखांच्या मानधनाची अद्याप प्रतिक्षाच...
अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. संगीता अल्फान्सो यांची साक्ष संपल्यानंतर दोन्ही वकिलांचा यक्तीवाद सुरु होणार आहे. त्यामुळे येत्या दीड महिन्यात अश्विनी बिद्रे खटल्याचा निकाल अपेक्षित असला तरी गृह विभागाने १५ लाख रुपयांचे मानधन अद्याप विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना दिले नाही. त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.