किसान कनेक्ट कंपनीच्या सर्व्हरवर अज्ञाताचा सायबर हल्ला 

किसान कनेक्ट या कंपनीच्या सर्व्हरवरमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश

नवी मुंबई : अज्ञात व्यक्तीने संगणकीय साधनांचा वापर करुन फळे भाजीपाला, किराणा व इतर वस्तूंची ऑनलाईन विक्री करणा-या किसान कनेक्ट या कंपनीच्या सर्व्हरवरमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करुन कंपनीची मोबाईल ऍफ्लिकेशन सेवा बंद पाडून कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत कंपनीने केलेल्या तक्रारीनंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.  

अज्ञात व्यक्तीने गत जून महिन्यात फळे भाजीपाला, किराणा व इतर वस्तूंची ऑनलाईन विक्री करणा-या किसान कनेक्ट या कंपनीच्या सर्व्हरवरमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करुन अचानक ओटीपीचा ओघ वाढवला होता. त्यामुळे कंपनीच्या सर्व्हर क्षमतेवर ताण पडून कंपनीच्या वेबसाईटची तसेच मोबाईल ऍफ्लिकेशनची सेवा खुपच मंदावला होता. मात्र  त्यानंतर देखील अज्ञात व्यक्तींकडुन या ओटीपीचा मारा सुरुच राहिल्याने 22 जुन रोजी कंपनीच्या सर्व्हरवर लोड पडल्यामुळे या कंपनीची मोबाईल ऍफ्लिकेशनची सेवा दोनवेळ बंद पडली. त्यामुळे कंपनीला येणा-या सरासरी ऑर्डरपेक्षा 511 ऑर्डर कमी आल्या.

तसेच शेतक-यांकडुन खरेदी करुन मागवण्यात आलेला नाशिवंत शेतमाल विकला न गेल्याने तो शेतमाल कंपनीला नष्ट करावा लागला. त्यामुळे कंपनीचे 4 लाख 38 हजाराचे आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर कंपनीच्या वतीने तज्ञांमार्फत याची तपासणी करण्यात आल्यानंतर अज्ञात व्यक्तीकडुन सदर कंपनीच्या सर्व्हरवर आघात करण्यात आल्याचे आढळुन आले. 9 संशयीत आयपी ऍड्रेसवरुन त्यांच्या वेबसाईटवर आघात करण्यात आल्याचे आढळुन आले. त्यानंतर कंपनीने आपली ऑनलाईन सेवा सुरळीत चालावी यासाठी एका मोबाईलच्या लॉगईनसाठी दिवसाला 4 ओटीपीची मर्यादा ठेवली. त्यानंतर कंपनीने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.  

किसान कनेक्ट सेफ फुड प्रा.लि. या कंपनीचे कार्यालय पावणे एमआयडीसीत असून या कंपनीचा वेबसाईट आणि किसान कनेक्ट सेफ फुड मोबाईल अफ्लिकेशन वरुन व्यवसाय चालतो. या कंपनीच्या ऑनलाईन फ्लॅटफॉर्मवर ग्राहक त्यांच्या मोबाईल ऍपवरुन फळे भाजीपाला, किराणा व इतर वस्तू मागवतात. त्या वस्तू घरपोच पोहोचवण्याचे काम किसान कनेक्ट कंपनीद्वारे केले जाते. या कंपनीच्या वेबसाईट आणि मोबाईल ऍफ्लिकेशनमध्ये लॉगईनसाठी ग्राहकाला त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर कंपनीतर्फे ओटीपी पाठविण्यात येतो. सदर ओटीपी टाकल्यानंतरच किसान कनेक्टच्या वेबसाईट आणि मोबाईल ऍफ्लिकेशन वरील उपलब्ध असलेल्या वस्तू पाहता येतात. तसेच त्यातून ग्राहकांना हवे असलेले उत्पादन ऑर्डर करता येतात.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरण :