किरकोळ कारणावरुन दोन्ही वाहन चालकांच्या कुटुंबियांमध्ये हाणामारी

गाडीला साईड देण्याच्या किरकोळ कारणावरुन कळंबोलीत दोन गटात तुंबळ हाणामारी 

नवी मुंबई : टोयाटा फॉर्च्युनर कार चालक व टाटा नेक्सॉन कार चालक या दोघांमध्ये गाडीला साईड देण्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातुन दोन्ही वाहन चालकांच्या कुटुंबियांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी सकाळी कळंबोलीत घडली. या हाणामारीत एका गटातील 7 तर दुसऱया गटातील 4 असे 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कळंबोली पोलिसांनी हाणामारी करणाऱया या दोन्ही कुटुंबातील 11 जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.  

कळंबोलीतील रोडपाली भागात राहणारा विक्रम ठाकुर (39) हा रविवारी सकाळी 11 वाजता त्याच्या टाटा नेक्सॉन कारने मार्केटमध्ये जात होता. यावेळी त्याची कार आशा हॉस्पीटल समोर आली असताना समोरुन दिवेश पुजारी (22) हा वडील प्रभाकर पुजारी यांच्यासह टोयोटा फॉर्च्युनर कारने कळंबोली सेक्टर-16 मध्ये जात होता. यावेळी दोघांची वाहेन एकमेकांसमोर आल्यानंतर गाडीला साईड देण्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी दिवेश पुजारी याने आपल्या गाडीतुन उतरुन शिवीगाळ करत विक्रम ठाकुरच्या तोंडावर, नाकावर आणि डोळ्यावर बुक्क्या मारल्या.  

त्यामुळे त्याच्या नाकामधुन रक्त येऊ लागल्याने तो गाडी घेऊन आपल्या घरी गेल्यानंतर विक्रमला रक्तबंबाळ अवस्थेत पाहुन त्याच्या कुटुंबियांनी त्याबाबत विचारणा केली. विक्रमने घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी विक्रमला मारहाण करणाऱया दिवेश पुजारी याला जाब विचारण्यासाठी थेट त्याच्या साकेतधाम सोसायटीत गेले. यावेळी दोन्ही कुटुंबियांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांना शिवीगाळ करत लाठी काठी, कोयता, सॅनिटायझर स्टँडने एकमेकांवर हल्ला केला. या हाणामारीत विक्रम ठाकुर सह त्याच्या कुटुंबातील 7 जण तर दिवेश पुजारीसह त्याच्या कुटुंबातील 4 जण असे एकुण 11 जण जखमी झाले आहेत.  

हाणामारीनंतर या दोन्ही कुटुंबानी कळंबोली पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही कुटुंबातील 11 जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवुन हाणामारी करणे, दंगल माजवणे व इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कार्यवाही सुरु केली आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पारसिक टेकडीच्या अविवेकी खोदकामाबद्दल चिंता व्यक्त