सफरचंदाच्या बॉक्समधुन आयात करण्यात आलेले तब्बल 502 कोटी रुपये किंमतीचे कोकेन जप्त

नवी मुंबई : दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्यात आलेल्या पेअर आणि हिरव्या सफरचंदाच्या बॉक्समधुन तब्बल 502 कोटी रुपये किंमतीचे कोकेन या अंमली पदार्थाची तस्करी करुन आणण्यात आल्याचे डीआरआच्या मुंबई झोनल युनिटने गुरुवारी न्हावाशेवा येथील बंदरात केलेल्या कारवाईवरुन उघडकीस आले आहे. या कारवाईत डीआरआयच्या पथकाने पेअर आणि हिरव्या सफरचंदाच्या बॉक्समध्ये लपवुन आणण्यात आलेले तब्बल 502 कोटी रुपये किंमतीच्या कोकेनची 50 किलो 200 ग्रॅम वजनाची 50 पाकिटे जप्त केली आहेत. या कारवाईवरुन परदेशातून न्हावाशेवा बंदरमार्गे वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ तस्करी करुन आणण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.   

दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेल्या फळांच्या कंटेनरमध्ये कोकेनचा मोठा साठा असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गत 6 ऑक्टोबर रोजी डीआरआयने न्हावाशेवा बंदरात सदर संशयीत कंटनेरचा शोध घेतला असता, तेली कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस) येथे एका कंटेनरमध्ये पेअर आणि सफरचंदाचे 1880 बॉक्स आढळुन आले. या फळांच्या बॉक्सची तपासणी करण्यात आली असता, फळांच्या खाली कोकेनची 50 किलो 200 ग्रॅम वजनाची 50 पाकिटे लपवुन आणण्यात आल्याचे आढळून आले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 502 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

दरम्यान, गत आठवड्यात  डीआरआयने वाशीमध्ये संत्र्यांचा ट्रक अडवुन त्यातून तब्बल 1476 कोटी रुपये किंमतीचे 198 किलो मेथॅम्फेटामाईन आणि 9 किलो कोकेन जफ्त केले होते. सदर संत्र्याच्या फळांची आयात केरळ येथील युम्मिट्टो इंटरनॅशनल फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनतर डीआरआयच्या पथकाने सदर कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक विगिन वर्गीस याला 2 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्यानंतर गुरुवारी 6 ऑक्टोबर रोजी डीआरआयने न्हावाशेवा बंदरात केलेल्या कारवाईत सफरचंद व पेअर या फळांची आयात देखील याच कंपनीने केल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे फळांच्या माध्यमातुन अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे या दोन कारवाईवरुन उघडकीस आले आहे.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पाम बीच मार्गावरील एका व्यापारी संकुलाच्या टेरेसवर अनधिकृत बार अँड रेस्टॉरट्स