नवी मुंबई महापालिकेत नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून फसवणुक

नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून फसवणुक करणा-यास 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून वाशीतील एका इस्टेट एजंटकडुन 2 लाख 20 हजार रुपये उकळून त्याची फसवणुक करणाऱया प्रदिप राजाराम अडसुळ (41) याला बेलापुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विकास बडे यांनी 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य दोन आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.  

या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपी प्रदिप अडसुळ हा वाशीमध्ये राहण्यास असून अडसुळ व त्याचा मित्र विलास पाटील या दोघांनी 2011 मध्ये वाशीत राहणाऱया संतोष सकपाळ यांना नवी मुंबई महापालिकेत नोकरीला लावण्याचे अमिष दाखवुन त्याच्याकडुन 2 लाख 20 हजार रुपये उकळले होते. मात्र अडसुळ याने नोकरीला न लावल्याने सकपाळ याने त्याच्या पाठीमागे तगादा लावला होता. त्यानंतर आरोपींनी सकपाळ यांना महापालिकेचे बनावट जॉईनिंग लेटर दिले होते. मात्र सदरचे पत्र बनावट असल्याचे समजल्यानंतर सकपाळ यांनी आरोपींकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आरोपी प्रदिप अडसुळ याने सकपाळ याला चेक दिला होता.  

मात्र आरोपी प्रदिप अडसुळ याने ज्या बँक ख्यात्याचा चेक दिला होता, ते बँक खातेच बंद असल्याने सदर चेक वटला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर  संतोष सकपाळ यांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी प्रदिप अडसुळ, विलास पाटील व विपुल कांबळे यांच्या विरोधात फसवणुकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन डिसेंबर 2013 मध्ये तिघांना अटक केली होती. त्यानंतर पोलिस सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गोडसे यांनी या प्रकरणाचा तपास करुन बेलापुर येथील न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.  

या प्रकणाची सुनावणी बेलापुर न्यायालयात सुरु होती. या सुनावणीदरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विकास बडे यांनी उपलब्ध साक्षी पुराव्यावरुन आरोपी प्रदिप अडसुळ याला दोषी ठरवुन त्याला दोन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 15 दिवसांची अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात विलास पाटील आणि विपुल कांबळे या दोघां विरोधात पुरावा न मिळाल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात सरकारी वकील म्हणुन श्रीधर फटाके यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर पोलिस नाईक धीरज सुर्यवंशी आणि कोठेकर यांनी न्यायालयातील कामकाज पाहिले.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सफरचंदाच्या बॉक्समधुन आयात करण्यात आलेले तब्बल 502 कोटी रुपये किंमतीचे कोकेन जप्त