महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन महिलांची तुंबळ हाणामारी
नवी मुंबई : लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन झालेल्या वादातून महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री ठाणे-पनवेल लोकलमध्ये तुर्भे ते सीवूड्स रेल्वे स्थानकादरम्यान घडली. यावेळी माहिलांची हाणामारी सोडविण्यासाठी सदर लोकलमध्ये चढलेल्या महिला पोलिसाला त्यातील एका महिलेने मारहाण केल्याने महिला पोलीस जखमी झाली असून तिच्यावर वाशीतील महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर वाशी रेल्वे पोलिसांनी हाणामारी करणाऱया माय लेकी विरोधात गुन्हा दाखल करुन त्यापैकी मुलीला अटक केली आहे. लोकलच्या महिला डब्यातील महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तळोजा येथे राहणारी गुळनाथ जुबरे खान (50) हि महिला आपली मुलगी अंजु खान (27) व दहा वर्षीय नात यांच्यासह बुधवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास ठाणे पनवेल लोकलने महिलांच्या डब्यातून ठाण्याहुन पनवेलच्या दिशेने जात होती. सदर लोकलमध्ये स्नेहा देवडे (30) हि महिला कोपरखैरणे रेल्वे स्थानकात चढल्यानंतर तुर्भे स्थानकात रिकाम्या झालेल्या जागेवर ती बसली. यावेळी गुळनाथ खान व तिची मुलगी अंजु खान या मायलेकींनी त्यांच्या 10 वर्षीय मुलीला त्या सीटवर बसू न दिल्याच्या कारणावरुन स्नेहा देवडे हिच्यासोबत वादावादीला सुरुवात केली. या वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाल्यानंतर दोघा मायलेकींनी स्नेहा देवडे हिचे केस पकडुन तिला मारण्यास सुरुवात केली. यावेळी इतर प्रवाशांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील त्यांनी हाता बुक्क्यांनी मारहाण सुरुच ठेवली.
सदर लोकल नेरुळ रेल्वे स्थानकात आल्यानंतर काही महिलांनी रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे महिला पोलीस शारदा उगले या तत्काळ महिलांच्या डब्यामध्ये भांडण सोडविण्यासाठी चढल्या. त्यामुळे माय लेकींनी काही काळ शांत बसल्या. मात्र लोकल सुरु होताच त्यांनी पुन्हा भांडण काढुन हाणामारी करण्यास सुरुवात केली. यावेळी महिला पोलीस शारदा उगले यांनी महिलांमध्ये सुरु असलेले भांडण सोडवित असताना, झालेल्या झटापटीत गुळनाथ खान हि खाली पडल्याने तिच्या डोक्याला सिटचा कोपरा लागुन ती जखमी झाली. या गोष्टीचा अंजु खान हिला राग आल्याने तिने स्नेहा देवडे हिच्या हातात असलेले चिनी मातीचे शो-पिस घेऊन ते महिला पोलीस शारदा उगले यांच्या डोक्यात मारले. त्यामुळे त्या रक्तबंबाळ होऊन जखमी झाल्या.
त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या हाणामारीत जखमी झालेल्या सर्वांना वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. स्नेहा देवडे या महिलेला मुका मार लागल्याने डॉक्टरांनी स्नेहा देवडे व गुळनाथ खान यांच्यावर उपचार करुन त्यांना सोडुन दिले. मात्र या मारहाणीत जखमी झालेल्या महिला पोलीस शारदा उगले यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली. या प्रकरणात अंजु खान व तिची आई गुळनाथ खान या दोघींवर सरकारी कामात अडथळा आणुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अंजु खान हिला अटक करण्यात आल्याचेही कटारे यांनी सांगितले.