महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
नवी मुंबई : पती सोबत किरकोळ कारणावरून झालेल्या वदातून वाशी गावात राहणाऱ्या सारिका मनोज भोईर (39) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे घडली.
या घटनेतील मृत सारिका भोईर ही विवाहिता पती मनोज भोईर, मुलगा व मुलगी यांच्यासह वाशी गावात सदाशिव पाटील यांच्या बिल्डिंगमध्ये राहत होती. भोईर यांचा मुलगा मोबाईल फोनचा अतीवापर करत असल्याने आपला मुलगा वाम मार्गाला लागू नये यासाठी मनोज भोईर यांनी आपल्या मुलाचा मोबाईल काढून घेतला होता. मात्र मोबाईल फोनमध्ये मुलगा बिघडत नसल्याचे सारिका भोईर हीचे म्हणणे होते. त्यामुळे मनोज भोईर यांनी मुलाकडून काढून घेतलेला मोबाईल फोन त्याला परत द्यावा, असे तिने पतीला सांगितले होते.
मात्र मनोज भोईर यांनी मुलाला मोबाईल फोन देण्यास नकार दिला होता. याच कारणावरून शनिवारी सायंकाळी मनोज भोईर व सारिका भोईर या दोघांमध्ये वादावादी झाली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून सारिकाने पती, मुलगा व मुलगी रात्री घरातील हॉलमध्ये झोपलेले असताना, सारिकाने बेडरूममध्ये साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मनोज भोईर यांना जाग आल्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहणी केली असता, सारिका गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आली. त्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या मदतीने सारिकाला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वाशी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.